पंढरपूर : पुण्यात सापडलेल्या पाच कोटींच्या रोकडप्रकरणी आता मोठी माहिती समोर येत आहे. सोमवारी खेड शिवापूर इथं नाकाबंदीवेळी तपासणीत ५ कोटींची रोकड आढळली होती. ज्या गाडीत ही रोकड सापडली ती गाडी सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यकर्त्याची आहे. आमदार शहाजी बापू पाटील यांनीही ते पैसे आपल्या कार्यकर्त्याचे असल्याचं सांगितलंय.
advertisement
आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगितलं की,"काय झाडी, काय डोंगर हा संवाद ज्याच्याशी झाला त्या रफीक नदापचे ते पैसे आहेत. पण माझा त्याच्याशी काही संबंध नाही." शहाजी बापू पाटील यांनी पाच कोटी रुपये सापडले त्याबाबतचा खुलासा केला. ते पैसे सांगोल्यातील उद्योगपतीचे आहेत हे देखील त्यांनी यावेळेस मान्य केलं.
सांगोला विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांना शिवसेनेकडून पहिल्या यादीमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात आली. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदीत सापडलेल्या पैशांचा आपल्याशी काही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेत बंडानंतर गुवाहाटीला नेते गुवाहाटीला गेले असताना आमदार शहाजी बापूंना एका कार्यकर्त्याचा फोन आला होता. तेव्हा शहाजी बापूंचा काय झाडी, काय डोंगार हा डायलॉग फेमस झाला होता. तो संवाद ज्या कार्यकर्त्यासोबत त्यांनी साधला होता त्याच्याच गाडीत पाच कोटींची रोकड आढळलीय.
विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आरोपावर बोलताना शहाजी बापू म्हणाले की, तुम्ही जेवढे बोलाल त्याच्या दसपट मी बोलेल असा इशारा त्यांनी या वेळेस दिला. त्याच बरोबर शेतकरी कामगार पक्ष हा माझा पारंपारिक विरुद्धपक्ष असून त्याचं मला आव्हान वाटत नाही. गुलाल माझाच आहे असा विश्वास शहाजी बाबू पाटील यांनी यावेळेस व्यक्त केला.
