अंकिताची आई तिला फोन करत होती...
अंकिताने हे टोकाचं पाऊल का उचललं, याचं कारण अद्याप समजू शकलं नाही. या प्रकरणी कॉलेजच्या महिला सुरक्षा रक्षक अनिता साखरे यांनी बार्शी तालुका पोलिसांना सविस्तर माहिती दिली आहे. अंकिताची आई तिला फोन करत होती, मात्र फोन उचलला जात नसल्याने त्यांनी कॉलेज प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला असून पोलीस आता आत्महत्येच्या कारणांचा शोध घेत आहेत.
advertisement
रूमचा दरवाजा आतून बंद
घटनेच्या वेळी अंकिताच्या रूमचा दरवाजा आतून बंद होता आणि खिडकीला पडदे लावलेले होते. सुरक्षा रक्षकांनी अनेकदा दरवाजा वाजवूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर संशय बळावल्याने खिडकीचं लॉक तोडून आत पाहिले असता, अंकिता सिलिंग फॅनला दोरीच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. या घटनेची माहिती मिळताच कॉलेज प्रशासनासह विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
सुसाईड नोट मिळाली नाही...
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना 24 जानेवारी रोजी रात्री 12 ते सकाळी 8 च्या दरम्यान घडली असावी. अंकिताच्या रूममध्ये कोणतीही सुसाईड नोट सापडली आहे की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. बार्शी तालुका पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
अंकिताच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स
दरम्यान, तपास अधिकारी आता अंकिताच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासून पाहत आहेत. घटनेपूर्वी तिचे कोणाशी बोलणे झाले होते किंवा ती मानसिक तणावात होती का, या दिशेने तपास सुरू करण्यात आला आहे. ऐन तरुण वयात उच्च शिक्षण घेत असलेल्या मुलीने अशा प्रकारे आयुष्य संपवल्यामुळे तिच्या मूळ गावी आणि कॉलेज परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
