गेल्या काही काळापासून कौटुंबिक वाद
नानासाहेब रामजी दिवेकर असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, त्यांचा खून स्वतःच्याच लहान भावाने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. मृत नानासाहेब आणि संशयित आरोपी लहानू रामजी दिवेकर यांच्यात गेल्या काही काळापासून कौटुंबिक वाद सुरू होते. याच वादाचा राग मनात धरून लहानूने 2 जानेवारीच्या रात्री ही हिंसक घटना घडवून आणली. जेव्हा नानासाहेब घरात गाढ झोपेत होते, तेव्हा त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
पत्र्याच्या शेडमध्ये खड्डा खोदून मृतदेह गाडला
खुनाचा कोणताही पुरावा मागे उरू नये या उद्देशाने, लहानूने घराच्या जवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये खड्डा खोदून मृतदेह तिथे गाडून टाकला. सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब यांच्या पथकाने सखोल चौकशी केली असता, लहानूने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांना काही ठिकाणी माती उकरलेली दिसली अन् संशय निर्माण झाला होता. विशेष म्हणजे, नानासाहेब दिवेकर हे पोलीस दलात येण्यापूर्वी भारतीय लष्करात देशसेवा बजावत होते.
एकट्याने खड्डा खोदून मृतदेह कसा पुरला?
दरम्यान, लष्करातून निवृत्त झाल्यावर 7 वर्षांपूर्वी ते महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाले होते आणि संभाजीनगर जिल्ह्यात कार्यरत होते. पण मृतदेह घरापासून काहीअंतरावर कसा नेला? एकट्याने खड्डा खोदून मृतदेह कसा पुरला? कौटुंबिक वाद काय होता,तो टोकाला का गेला? आणि गुन्ह्यात वापरलेले शस्त्रजप्त का केले नाही? असे सवाल आता विचारले जात आहेत.
