कडब्याच्या गंजीत विवाहितेचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवेढ्यातील पाटकळ गावात नागेश सावंत आणि त्यांची पत्नी किरण सावंत राहत होते. 14 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास किरणने आपल्या शेतातील कडब्याच्या गंजीत स्वतःला पेटवून घेतल्याची बातमी आली. या घटनेनंतर किरणचा पती नागेश पत्नीच्या वियोगाने आक्रोश करत होता. त्याचवेळी किरणचे वडीलही घटनास्थळी पोहोचले, पण त्यांनाही आपल्या मुलीचा मृतदेह ओळखता आला नाही. किरणच्या माहेरच्यांनी हा आत्महत्येचा प्रकार नसून, हत्या असल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांना सखोल चौकशीची विनंती केली.
advertisement
कराडमध्ये एका तरुणासोबत
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, त्यांना धक्कादायक माहिती मिळाली. ज्या किरणचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला होता, ती किरण प्रत्यक्षात कराडमध्ये एका तरुणासोबत राहत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने किरण आणि तिच्यासोबत असलेल्या तरुणाला ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
कडब्याच्या गंजीत जळालेला मृतदेह कुणाचा?
किरण जर जिवंत असेल, तर कडब्याच्या गंजीत जळालेला मृतदेह नेमका कोणत्या महिलेचा होता, हा प्रश्न आता समोर आला आहे. या गूढ मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी मृतदेहाचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले आहेत. या अहवालातूनच मृत महिलेची खरी ओळख समोर येईल अशी अपेक्षा आहे.
क्राईम थ्रिलर स्टोरी
दरम्यान, एका साध्या घटनेला एखाद्या क्राईम थ्रिलर चित्रपटाचे रूप देणाऱ्या या घटनेने मंगळवेढ्यासह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडवली आहे. या प्रकरणातील गूढ उकलण्याची उत्सुकता आता सर्वांनाच लागून राहिली आहे.
