सोलापूर : देशभरात नवरात्रोत्सव धुमधडाक्यात साजरा झाला. वर्षांमागून वर्षे सरल्यानंतर यंदा 9 दिवसांचा पूर्ण नवरात्रोत्सव साजरा होऊन दहाव्या दिवशी दसरा होता. हे दहाही दिवस अगदी आनंदात सरले. आता मात्र सगळीकडे शांतता आहे. परंतु तुळजापूरमध्ये आजही प्रचंड उत्साहाचं वातावण आहे, कारण तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव 3 ऑक्टोबर 2024 पासून 18 ऑक्टोबर 2024 पर्यंत साजरा होतोय.
advertisement
16 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे, तर 17 ऑक्टोबरला मंदिर पौर्णिमा साजरी होईल. यानिमित्त सोलापूरसह राज्यातून भाविक येतीलच, शिवाय दरवर्षी कर्नाटक राज्यातूनही मोठ्या संख्येनं भाविक तुळजापूरकडे येतात. त्यामुळे कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये, प्रवाशांना, वाटसरूंना त्रास होऊ नये यासाठी तुळजाभवानी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहनं इतर मार्गे वळविण्यात आली आहेत.
14 ऑक्टोबर 2024 रोजी 00.01 वाजल्यापासून 17 ऑक्टोबर 2024 रोजी 24.00 वाजेपर्यंत तुळजापूर ते सोलापूर आणि तुळजापूर ते बार्शी या मार्गांवर पोलीस, रुग्णसेवा, अग्निशमन दलाची वाहनं, अत्यावश्यक सेवेतील वाहनं आणि एस. टी. बसस वगळून सर्व प्रकारच्या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. तसंच 14 ऑक्टोबर 2024 रोजी 00.01 वाजल्यापासून 17 ऑक्टोबर 2024 रोजी 24.00 वाजेपर्यंत तुळजापूर घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद असणार आहे. तसे आदेशच जिल्हादंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण अतुल वि. कुलकर्णी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (ब) अन्वये अधिकाराचा वापर करून भाविकांच्या सुरक्षिततेच्या कारणावरून, खालीलप्रमाणे वाहतूक मार्गात बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, 14 ऑक्टोबर 2024 रोजी 00.01 वाजल्यापासून 17 ऑक्टोबर 2024 रोजी 24.00 वाजेपर्यंत खालील मार्गावरून सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे.
- तुळजापूर ते सोलापूरकडे येणाऱ्या वाहतुकीस तुळजापूर, तामलवाडी, सोलापूर यादरम्यान मनाई.
- सोलापूर ते तुळजापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीस सोलापूर, तामलवाडी, तुळजापूर यादरम्यान मनाई.
- तुळजापूर ते बार्शीकडे येणाऱ्या वाहतुकीस तुळजापूर, ढेकरी, गौडगाव, बार्शी यादरम्यान मनाई.
- बार्शी ते तुळजापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीस बार्शी, गौडगाव, ढेकरी, तुळजापूर यादरम्यान मनाई.
वरिल मार्गांवरील वाहनं खालील मार्गावरून धावतील
- तुळजापूर ते सोलापूरकडे येणारी वाहतूक मंगरूळपाटी, इटकळ, बोरामणी पुढे सोलापूर या मार्गे जाईल.
- सोलापूर ते तुळजापूरकडे जाणारी वाहतूक सोलापूरपासून बोरामणी, इटकळ, मंगरूळपाटीहून पुढे तुळजापूर या मार्गे जाईल.
- तुळजापूर ते बार्शीकडे जाणारी वाहतूक तुळजापूर, धाराशिव, वैराग पुढे बार्शी या मार्गे जाईल.
- बार्शी ते तुळजापूरकडे जाणारी वाहतूक बार्शी, वैराग, धाराशिव पुढे तुळजापूर या मार्गे जाईल.
- धाराशिव ते सोलापूरकडे येणारी वाहतूक वैरागमार्गे जाईल.
- सोलापूर ते धाराशिवकडे जाणारी वाहतूक वैरागमार्गे जाईल.
दरम्यान, पोलीस, रुग्णसेवा, अग्निशमन दलाची वाहनं, अत्यावश्यक सेवेतील वाहनं आणि एस. टी. बसेसना वरील बंधनं लागू नसतील.