मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील चोपडा शिरपूर रस्त्यावरील भोरखेडा गावाजवळ ही घटना घडली. या अपघातात नकुल चौधरी आणि हर्षल चौधरी या दोन भावांचा मृत्यू झाला. भोरखेडा गावाजवळील रस्त्यावर मोटरसायकलवर उभे असलेल्या दोघ भावंडांना मागून आलेल्या भरधाव डंपरने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
चोपडा-शिरपूर रस्त्यावरील भोरखेडा गावाजवळ चहाचा स्टॉल आहे. या ठिकाणी नकुल चौधरी आणि हर्षल चौधरी चहा पिऊन आपल्या दुचाकीजवळ उभे होते. त्याचवेळी अचानक एम एच 18 बी झेड 3220 क्रमांकाचा डंपर भरधाव वेगात आला आणि दोन्ही भावांना दुचाकीसह जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, भरधाव डंपरच्या धडकेमध्ये दुचाकीचा चक्काचूर झाला. तर नकुल चौधरी आणि हर्षल चौधरी दोघेही जबर मार लागल्यामुळे जागेवरच मृत्यू झाला.
advertisement
अपघातात दोघे चिरडल्या गेल्याचं लक्षात येताच डंपर चालक फरार झाला आहे. घटनास्थळी गावकऱ्यांनी धाव घेतली आणि डंपरचालकाला अडवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत तो फरार झाला होता. नकुल चौधरी आणि हर्षल चौधरी यांना तातडीने शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं.
या अपघाताची माहिती कळताच मृतांच्या नातेवाईकांनी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दोघ भावंडांचा डंपरने चिरडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याने यावेळी नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस या अपघाताची चौकशी करत असून फरार चालकाचा शोध घेत आहेत.
