छत्रपती संभाजीनगर : बीडहून छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव वेगात जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसने रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला उडवल्याची घटना घडली. या दुर्घटनेत दुचाकीवरील महिलेचा चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला आहे. तर तिचा पती गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर - बीड या राष्ट्रीय महामार्गावर दाभरुळ गावाजवळील रोहिलागड फाट्यावर घडली. दरम्यान हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील महिला ही बसच्या खाली मधोमध अडकल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
advertisement
या अपघाताविषयी मिळालेली माहिती अशी की, पैठण तालुक्यातील वरुडी येथील शामराव देवघरे व त्यांची पत्नी कमल शामराव देवघरे हे दोघे पती - पत्नी दाभरूळ येथे नातेवाईकांकडे सावडण्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते.सावडण्याचा कार्यक्रम आटोपून आज दुपारी दुचाकीने क्र ( एम एच २० एफ बी ३५५८ ) दाभरूळहून ( थापटी मार्गे ) वरुडी येथे आपल्या घरी परतत असताना रोहिलागड फाट्यावर रस्ता ओलांडताना धाराशिवहून- छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बस क्र ( एम एच ०९ ई एम ९६५८ ) ने त्यांच्या दुचाकीला उडवले.
नेमका कसा झाला अपघात?
कमल शामराव देवघरे ( वय ४८ )या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती शामराव आनंदराव देवघरे (वय ५३ ) हे गंभीररीत्या जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण घडला की सदरील बसच्या पाठीमागच्या चाकाखाली चिरडल्याने कमल देवघरे यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला.शामराव देवघरे यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालय दाखल करण्यात आले आहे.या अपघाताची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. मयत कमल देवघरे यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी सून असा परिवार आहे.
सावडण्याचा कार्यक्रम आटोपून परतताना घडली घटना
श्यामराव देवघरे यांच्या नातेवाईकाचे निधन झाल्याने दाभरुळ येथे सावडण्याचा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम आटोपून हे दांपत्य दुचाकीने गावी परतत होते. दरम्यान रोहिलागड फाट्याचा रस्ता ओलांडत असतांना काही कळण्याच्या आतच बसने त्याच्या दुचाकीला उडविले.यात कमलाबाईचा दुर्देवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
