नाशिक: ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारतीय हवाई दलाने आपली क्षमता सगळ्या जगाला दाखवून दिली. भारतीय हवाई दलाच्या स्ट्राइकमध्ये दहशतवाद्यांच्या तळासह पाकिस्तान हवाई दलाची धावपट्टी उद्धवस्त झाली होती. आता पाकिस्तानची झोप उडणार आहे. भारतीय हवाई दलाची ताकद आणखीच वाढणार आहे. महाराष्ट्रातील नाशिकमध्ये भारतीय हवाई दलाचे खास शस्त्र तयार केले जात आहे.
advertisement
भारतीय संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात मोठी झेप घेत, नाशिकमधील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) प्रकल्पात आता स्वदेशी तेजस एमके-१ ए लढाऊ विमानांच्या निर्मितीला वेग मिळाला आहे. सहा दशकांच्या कारकिर्दीत एचएएलने आतापर्यंत ९०० हून अधिक लढाऊ विमानांची निर्मिती आणि सुमारे २,००० विमानांची देखभाल-दुरुस्ती केली आहे. या अनुभवाच्या बळावर तेजस निर्मितीची नवी पायरी गाठण्यात आली आहे.
सध्या तेजस उत्पादनाच्या दोन साखळ्या बंगळुरूमध्ये कार्यरत आहेत, तर नाशिक प्रकल्पातील ही तिसरी उत्पादन साखळी ठरणार आहे. भारतीय हवाई दलाचा ताफा सतत युद्धसज्ज ठेवण्यात हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका निभावतो.
या नव्या टप्प्याचा प्रारंभ शुक्रवारी सकाळी झाला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिल्या तेजस एमके-१ ए विमानाचे उड्डाण पार पडले. याचवेळी एचएएलच्या तेजस एमके-१ ए उत्पादन साखळीचा आणि एचटीटी-४० प्रशिक्षणार्थी विमानाच्या दुसऱ्या उत्पादन साखळीचा लोकार्पण सोहळाही पार पडला आहे.
नाशिक प्रकल्पातून यापूर्वी ३०० सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानांची निर्मिती झाली होती आणि हे काम निर्धारित वेळेआधी पूर्ण केल्याचा उल्लेखनीय इतिहास एचएएलच्या नावे आहे.
भारतीय हवाई दलाने लढाऊ विमानांच्या ताफ्यातील असमतोल दूर करण्यासाठी तेजस एमके-१ ए विमानांचे उत्पादन गतीने आणि नियोजित वेळेत पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. या माध्यमातून भारताचे स्वदेशी संरक्षण सामर्थ्य आणखी बळकट होण्याची शक्यता आहे.