या सगळ्यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याचा आमचा निर्णय योग्यच असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. शिवाय दोन्ही पक्ष एकत्र येणार होते. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण करणार होते, याबाबत विचारलं असता भुजबळांनी उत्तर देणं टाळलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी दोन ते तीन वेळा या प्रश्नाला बगल दिली. भुजबळांच्या या प्रतिक्रियेनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
advertisement
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत, याबाबत आपल्याला कल्पना नाही. शरद पवारांच्या या वक्तव्याबद्दल विचारलं असता छगन भुजबळ म्हणाले की, मला या प्रश्नावर काही बोलायचं नाही. कालपासून CLP ची मिटींग व्हावी, पत्र लवकर निघावं, हा माझा प्रयत्न होता. जोपर्यंत मिटींग होतं नाही. तोपर्यंत पुढचे निर्णय होत नाहीत. हे पद सगळ्यात मोठं आहे. राष्ट्रवादीकडे सगळ्यात महत्त्वाचं पद कोणतं असेल तर ते उपमुख्यमंत्रीपद आहे. त्यामुळे ते पद आणि सूत्र सुनेत्राताईंच्या हातात देणं महत्त्वाचं आहे. नंतर ते पुढे ठरवतीलकाय करायचं ते, असंही भुजबळ म्हणाले.
"पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षापेक्षा आमच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं उपमुख्यमंत्री पद आहे. तिथे सर्व शक्ती एकवटली आहे. पक्ष मजबूत करून पक्षाला पुढे घेऊन जाण्याची शक्ती त्या पदात आहे. त्यामुळे त्यावर आमचं पूर्णपणे लक्ष आहे. त्या एकदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली बाकीचे लोक चर्चा करतील, कुठे जायचं काय करायचं ते ठरवतील. प्राप्त परिस्थितीत हा निर्णय योग्यच आहे", अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली.
