शरद पवारांच्या वक्तव्यानंतर राज्यात नवा सत्तासंघर्ष सुरू झाला का? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे सुनेत्रा पवार शपथविधी घेण्यासाठी मुंबईत दाखल झाल्या असताना बारामतीत हालचालींना वेग आला आहे. सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्रीपद दिलं जात असल्याने पवार कुटुंबात खळबळ उडाली आहे. तीन पिढ्याचे नेते एकत्र आले आहेत.
बारामतीतील शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या गोविंद बाग येथे पवार कुटुंबातील सदस्यांची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार, रोहित पवार आणि संदीप क्षीरसागर उपस्थित आहेत. या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पवारांना विश्वासात न घेता सुनेत्रा पवारांचा शपथविधी सोहळा पार पडत असल्याने आता याबाब विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत.
advertisement
दरम्यान, शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणावर देखील भाष्य केलं आहे. मागील चार महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर चर्चा होती. अजित पवार आणि जयंत पाटील दोघंही यावर चर्चा करत होते. हा निर्णय अंतिम टप्प्यात आला होता. विलिनीकरणाची तारीख देखील ठरली होती. येत्या १२ तारखेला विलिनीकरणाचा निर्णय होणार होता, असं मोठं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.
इतकंच नव्हे तर अजित पवारांनी विलीनीकरणाबाबत 14 बैठका घेतल्या होत्या. विलीनीकरणाबाबत अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात बैठका झाल्या होत्या. बैठकीत सहभागी झालेले नेते विलीनीकरणावर सकारात्मक होते. त्या बैठकीत विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता. दोन राष्ट्रवादी एकत्र व्हाव्यात ही अजितदादांची इच्छा होती. त्यांची ही इच्छा पूर्ण व्हावी, अशी आमची इच्छा आहे, असं मोठं वक्तव्य देखील शरद पवारांनी केलं आहे. या वक्तव्यातून त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याला थेट ग्रीन सिग्नल दिला आहे. मात्र विलीनीकरणासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटातील मोठे नेते उत्सुक नाहीयेत. त्यामुळेच त्यांनी घाईघाईत सुनेत्रा पवारांच्या हाती उपमुख्यमंत्री पदाची सूत्रं दिल्याचा आता चर्चा सुरू झाली आहे.
