धाराशिव : अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने हे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिलं. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा हा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर तो राज्यपालांकडे पाठवण्यात आला आणि त्यानंतर राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला बोलावलं.
advertisement
सुनेत्रा पवार या माहेरून धाराशिवच्या आहेत. धाराशिवच्या तेर या गावातील नागरिक सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होत आहेत, हे समजल्यानंतर भावुक झाले. एकीकडे अजित पवारांचा मृत्यू झाल्याचं दुःख त्यांच्या मनात आहे, तर दुसरीकडे आमची लेक उपमुख्यमंत्री होत आहे, ही भावनाही मनात असल्याच्या प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांच्या तेर गावातील गावकऱ्यांनी दिल्या आहेत. सुनेत्रा पवार या धाडसाने उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळतील, असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदावर विराजमान होत आहेत. गावच्या लेकीला राज्याच्या राजकारणात महत्त्वाचं पद मिळत असल्यामुळे सुनेत्रा पवार यांचं माहेर असलेल्या तेर गावातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. एकीकडे लाडका जावई गेल्यातं दुःख तर दुसरीकडे लाडकी लेक उपमुख्यमंत्री होणार याचा आनंद आहे, पण तो साजरा करावं, असं मन होत नाही, अशा भावना गावातील ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.
सुनेत्रा पवार यांना पद्मसिंह पाटील यांच्या घरातील राजकीय वारसा आणि पवार कुटुंबातील राजकीय जडणघडण आहे, त्यामुळे या अडचणीच्या कालावधीत त्यांच्याकडे आलेले उपमुख्यमंत्रीपद आहे, त्या पक्षाला योग्य पद्धतीने न्याय देतील असा विश्वास तेर मधील गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे, तसंच गावकऱ्यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी देखील जागवल्या.
