सुनेत्रा पवार आजच्या बैठकीसाठी काल रात्रीच बारामतीहून निघाल्या. आज सकाळपासून त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची देवगिरी निवासस्थानी भेटी घेतल्या. ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे जाणून घेतले. नियोजित वेळेनुसार आज दुपारी दोन वाजता विधिमंडळात गटनेते निवडण्यासाठीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
बैठकीला कोण कोण उपस्थित?
नेता निवडीच्या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे, तसेच महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रवादीचे सगळेच मंत्री, पक्षाचे विधानसभा आणि विधान परिषदेचे सगळेच आमदार उपस्थित होते. या आमदारांनी एकमताने सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
advertisement
सुनेत्रा पवार आज संध्याकाळी ५ वाजता पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार
सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी औपचारिक निवड झाल्यानंतर आज संध्याकाळी पाच वाजता त्या मंत्रिपदाची शपथ घेतील. राजभवनात अत्यंत साधेपणाने हा सोहळा पार पडेल. केवळ १० ते १५ मिनिटांच्या या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
सुनेत्रा पवार यांना लहानपणीच राजकारणाचे बाळकडू
सुनेत्रा पवार यांना लहानपणीच राजकारणाचे बाळकडू मिळाले. त्यांचे माहेरचे पाटील कुटुंब हे राजकारणातील त्यावेळसचे महत्त्वाचे कुटुंब होते. त्यांचे वडील बाजीराव पाटील हे त्याकाळचे मोठे स्थानिक नेते होते. तेर गाव आणि आसपासच्या बारा वाड्यांचे ते कारभारी पाटील होते. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र पद्मसिंह पाटील हे राज्याचे गृहमंत्री होते. त्यांनी दीर्घकाळ शरद पवार यांच्यासोबत काम केले. त्यांच्यानंतर त्यांचा वारसा त्यांचे पुत्र राणा जगजीतसिंह पाटील यांनी पुढे चालवला. आता सुनेत्रा पवार देखील उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारून नव्या आव्हानाला तोंड द्यायला सज्ज आहेत.
