रोजच्या जेवणात तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळलात? मग झटपट करा कर्ड राईस, सोप्या रेसिपीचा Video
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
भात हा आपल्या रोजच्या जेवणात हमखास असणारा पदार्थ आहे. घराघरांत भाताचे अनेक प्रकार बनवले जातात.
पुणे: भात हा आपल्या रोजच्या जेवणात हमखास असणारा पदार्थ आहे. घराघरांत भाताचे अनेक प्रकार बनवले जातात. साधा भात, मसाले भात, पुलाव, बिर्याणी, नारळी भात किंवा साखर भात असा भाताचा वेगवेगळ्या चवींमध्ये आस्वाद घेतला जातो. आज आपण भाताचाच एक वेगळा, पण अतिशय सोपा आणि चविष्ट प्रकार पाहणार आहोत. तो म्हणजे दही भात अर्थात कर्ड राईस. विशेष म्हणजे हा दही भात करताना कच्च्या भाज्यांचा वापर केला जाणार असल्याने तो अधिक पौष्टिक होणार आहे. ही रेसिपी वसुंधरा पाटकुले यांनी बनवून दाखवली आहे.
कर्ड राईस साहित्य
शिजवलेला भात, दही, ओला हरभरा, गाजर, पातीचा कांदा, तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर, साखर, मीठ हे साहित्य लागेल.
कर्ड राईस कृती
सुरुवातीला भात शिजवून घ्या. भात शिजवताना तो फार मऊ किंवा चिकट होणार नाही याची काळजी घ्या. भात शिजल्यानंतर तो पूर्णपणे थंड होऊ द्या. गरम भातात दही घातल्यास दही फाटू शकते, त्यामुळे भात पूर्ण थंड असणे आवश्यक आहे. भात थंड झाल्यावर मोकळा करून घ्या, आता फोडणी तयार करा. एका कढईत आवश्यकतेनुसार तेल घाला. तेल चांगले गरम झाल्यावर त्यात मोहरी घाला त्यानंतर जिरे, कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि थोडासा हिंग घालून फोडणी तयार करा. ही फोडणी बाजूला ठेवून पूर्णपणे थंड होऊ द्या.
advertisement
यानंतर मोकळा करून ठेवलेल्या भातामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडी साखर घाला. त्यात दही घालून सगळे नीट एकजीव करून घ्या. दह्याचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता. आता या मिश्रणात उकडलेला ओला हरभरा, बारीक चिरलेले गाजर आणि बारीक चिरलेला कांदा घाला. सर्व साहित्य हलक्या हाताने मिक्स करा, आता गार झालेली फोडणी भातात घालून पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करा. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आवडीनुसार वरून डाळिंबाचे दाणे किंवा भाजलेले शेंगदाणेही घालू शकता. अशा प्रकारे, पौष्टिक आणि चविष्ट व्हेजिटेबल कर्ड राईस तयार होतो.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 3:03 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
रोजच्या जेवणात तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळलात? मग झटपट करा कर्ड राईस, सोप्या रेसिपीचा Video









