पहिल्यांदा सुनेत्रा वहिनींचा जन्म आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल जाणून घेऊयात. सुनेत्रावहिनी पवार यांचे माहेर धाराशिव जिल्ह्यातील संत गोरोबाकाकांची पावन भूमी असलेले तेर गाव. वडील मराठवाडा मुक्तीसंग्रामात स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचे बंधू माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे दीर्घकालीन राजकारणात होते. त्यामुळे राजकारण त्यांनी लहानपणापासूनच जवळून पाहिले. त्यामुळे समाजकारण आणि राजकारणाचे बाळकडू त्यांना आपोआपच प्राप्त झाले होते.
advertisement
सुनेत्रावहिनी अर्थशास्त्राची पदवी (बी.कॉम.) घेतली आहे. यासोबत त्या अनेक कलागुणांत पारंगत आहेत. विशेषतः पेंटींग, संगीत, फोटोग्राफी आणि शेती हे त्यांचे विशेष आवडीचे विषय आहेत. त्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईच्या नेहरू सेंटरमध्येही झाले आहे.
अजित पवार यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर त्या काटेवाडीतील शेतीत रमल्या.प्रसंगी स्वतः शेतात राबायला सुरुवात केली. त्यावेळी काटेवाडी, कण्हेरीतील कष्टकरी वर्गाशी त्यांचा संपर्क आला. तात्यासाहेबांची सून आणि अजितदादांची बायको आपल्यासोबत स्वतः शेतात उभी राहते याचे इतरांना आश्चर्य वाटले नसते तरच नवल. मात्र, जे काही करायचं ते मन लावून करायचं, एखादी गोष्ट स्वीकारली तर ती तडीस न्यायची, या स्वभावाने त्यांनी काटेवाडीची शेती स्वतःच्या घामाने फुलवली. केवळ शेतीच नाही तर आधीची दहा हजार पक्षांची पोल्ट्री त्यांनी एक लाखावर नेली.दादांनी सुरु केलेल्या शारदा दूध डेअरीत देखील लक्ष घालून दूध संकलन वाढवले.
अजितदादांना जेवणाचा डब्बा घेऊन जायच्या...
लग्नानंतर 5 वर्षात अजितदादांचे राजकारण विस्तारत गेले आणि साहजिकच संपूर्ण जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर येऊन पडली. त्यांनीही ती आनंदाने आणि समर्थपणे पार पाडली.त्यानंतर 1991 साली अजितदादा खासदार झाले आणि त्यानंतर अवघ्या तीनच महिन्यात आमदार झाले, मंत्रीही झाले.त्यामुळे सुनेत्रावहिनींचे वास्तव्याचे ठिकाण मुंबई झाले. दरम्यानच्या काळात विद्या प्रतिष्ठानची विद्यानगरी उभारणीवेळी अजितदादा बऱ्याचदा रुईच्या माळरानावर ठाण मांडून असायचे. त्यावेळी अजितदादांचा दुपारचा जेवणाचा डबा घेऊन सुनेत्रावहिनी यायच्या आणि त्याही या उभारणीच्या कामाच्या साक्षीदार व्हायच्या. त्यावेळी त्यांचा रुई व परिसरातील जनतेशी जवळून संपर्क आला. पुढे नंतर त्या विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त झाल्या असल्या तरी विद्यानगरी उभारणीच्या कामात त्या पहिल्यापासून सहभागी आहेत.
सुनेत्रा पवार यांनी राज्य शासनाच्या स्वच्छता अभियानात मोलाचा सहभाग घेवून स्वतःचे गाव काटेवाडी राज्यात सर्वप्रथम आणले. सोबतच त्यांनी निर्मल ग्रामची चळवळ यशस्वी करण्यात मोठा सहभाग नोंदवला. विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त होण्याआधीपासून या संस्थेच्या कामात त्या सक्रिय राहिल्या. याचे कारण म्हणजे पवारसाहेब आणि अजितदादा हे राजकारणात व्यस्त झाल्याने सुनेत्रावहिनींना विद्या प्रतिष्ठानच्या प्रत्येक बाबीत लक्ष घालावे लागले. कोणतेही पद नसताना या संस्थेच्या जडणघडणीत मोलाचे योगदान त्या देत आल्या आहेत.पुढे विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्य, त्यानंतर याच विद्यापिठाच्या सिनेट सदस्यपदी त्यांना संधी मिळाली. या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या.
काटेवाडीचा कायापालट केला
सन 2002 पर्यंत त्यांच्या काटेवाडी गावातील चित्र विदारक असेच होते. गावात घाणीमुळे आणि परिपूर्ण आरोग्य सेवेची सोयच नसल्याने गावात अनारोग्याचे वातावरण होते. अशा परिस्थितीत सुनेत्रा पवार यांनी ग्रामस्थांमध्ये आत्मविश्वासाचे बीज पेरून ग्रामविकासाची चळवळ सुरु केली. त्यांनी हाती घेतलेल्या ग्रामविकासाच्या कामातून काटेवाडी निर्मलग्राम, यशवंतग्राम, तंटामुक्तग्राम, विमाग्राम, देशातील पहिले सायबरग्राम, कृषिग्राम आणि पर्यावरणग्राम झाले. पुढे ग्रामपंचायतसह, प्राथमिक शाळा, अंगणवाडीला आय.एस.ओ. मानांकन देखील मिळाले.
शैक्षणिक विकासासाठी सुनेत्रावहिनींनी 'शाळा प्रवेश उत्सव दिन' उपक्रम सुरू केला, जो पुढे राज्य सरकारचा अधिकृत कार्यक्रम झाला. गाव हागणदारीमुक्त करताना त्यांनी घेतलेली भूमिका पुढे संपूर्ण राज्यात 'गुड मॉर्निंग पथक' या नावाने स्विकारली गेली. पिण्यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेत फिल्टर प्लँट बसवणारी आणि भूमिगत गटार योजना राबवणारी काटेवाडी पहिली ग्रामपंचायत ठरली. 'झीरो बॅलन्स अकाउंट'ची 'जनधन योजना' २०१४ नंतर आली; मात्र त्यापूर्वीच सात वर्षांपूर्वी काटेवाडीत राष्ट्रीयीकृत बँकेशी सामंजस्य करार करून 'झीरो बॅलन्स'ची अनेक बँक खाती उघडली गेली. बँक सुविधा केंद्राची देशाला देणगी दिली ती काटेवाडीने आणि भारतात प्रथमच वाय मॅक्सच्या माध्यमातून महा ई-सेवा केंद्रांचा प्रारंभ झाला तो काटेवाडीतून.
त्यांनी महिलांना संघटित करून त्यांच्यातील 'स्वत्व' जागृत केले. ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंद करून घरांवर महिलांची मालकी निर्माण केली. घराच्या दारावर महिलांच्याही नावाच्या पाट्या लावल्या, ज्यामुळे खऱ्या अर्थाने तमाम महिलांना 'मालकीन' केले ते काटेवाडीतील याच चळवळीने. त्यांच्या या कामाचा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मान झालाच शिवाय अनेक राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय मान, सन्मान त्यांना प्राप्त झाले.
सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बारामती तालुक्यात सामाजिक उपक्रमांची एक मालिकाच निर्माण झाली. बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या 6 हजार महिलांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. बारामतीत राबविलेल्या महाआरोग्य शिबिरांमधून दिलासा मिळालेल्या रुग्णांची संख्या लाखांच्या घरात आहे. कृषी विकासात काम करताना त्यांनी 'महाराष्ट्र स्टेट अॅग्री अँड रुरल टुरिझम फेडरेशन' (मार्ट) या संस्थेची स्थापना केली. ग्रामीण भागातील युवक उद्योजक व्हावा या हेतूने त्यांनी आंतरराष्ट्रीय ग्रामीण उद्योजकता शिबिराचे आयोजन केले.
पवार कुटुंबात दाखल झाल्यानंतर आणि सामाजिक क्षेत्रात सिद्ध केल्यानंतर 40 वर्षांनंतर त्या खासदार म्हणून संसदेत दाखल झाल्या. राज्यसभेत व्यापक हिताचे अनेक प्रश्न त्या मांडत आहेत. त्यांची खासदारकीची पहिलीच टर्म असूनही राज्यसभेच्या सभापती महोदयांनी सभागृहाच्या तालिका सभापतीपदी त्यांची निवड केली. त्यांनी शिक्षण, महिला, बालक, युवक आणि वस्त्रोद्योग अशा विविध संसदीय समित्यांवर काम करताना अनेक महत्त्वपूर्ण विषयांकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे. मेक्सिको येथे संपन्न झालेल्या जगभरातील महिला खासदार परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली, जिथे त्यांनी महिलांच्या हक्कांबाबत ठाम भूमिका मांडली.
