सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री बनणार असल्या तरी त्यांच्याकडे आणखी दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत. त्यांच्या क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क अशा दोन खात्याची जबाबदारी देखील देण्यात येणार आहे. मात्र अजित पवारांकडे असलेलं वित्त आणि नियोजन हे महत्त्वाचं खातं मात्र भाजपकडे राहणार असल्याची माहिती आहेत. मागील अनेक वर्षांपासून अजित पवार या खात्याचे मंत्री होते. आता त्यांच्या निधनानंतर हे खातं भाजप आपल्याकडे ठेवणार असल्याची माहिती आहे.
advertisement
याशिवाय पक्षाची सगळी सूत्रं देखील सुनेत्रा पवारांकडेच राहणार आहेत. अजितदादांचा उत्तराधिकारी म्हणून पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद देखील त्यांनाच मिळणार असल्याची माहिती आहेत. त्यामुळे आता राज्यातील कार्यकर्त्यांना जोडून ठेवण्याचं, त्यांना बळ देण्याचं मोठं आव्हान सुनेत्रा पवारांसमोर असणार आहे. आता या सगळ्या जबाबदाऱ्या सुनेत्रा पवार कशा सांभाळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
खरं तर, यंदाचं आर्थिक बजेट अर्थमंत्री म्हणून अजित पवार सादर करणार होते. तशी त्यांनी तयारी देखील केली होती. ते संपूर्ण प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवून होते. पण त्यांच्या अकाली निधनाने बजेट कोण सादर करणार असा प्रश्न होता? पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बजेट सादर करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मी स्वत: त्यात लक्ष घालत असल्याची प्रतिक्रिया देखील फडणवीसांनी दिली आहे.
