सर्व नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर सुनेत्रा पवारांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी फायनल करण्यात आलं. पण याबाबत आपल्याला काहीच कल्पना नसल्याचं वक्तव्य आता शरद पवारांनी केलं आहे. त्यामुळे पवारांना अंधारात ठेवून हा निर्णय घेण्यात आला का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं विलीनीकरण देखील होणार असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. असं असताना अशाप्रकारे पवारांना अंधारात ठेवून निर्णय घेतल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे.
advertisement
यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणावर देखील भाष्य करताना म्हणाले, मागील चार महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर चर्चा होती. अजित पवार आणि जयंत पाटील दोघंही यावर चर्चा करत होते. हा निर्णय अंतिम टप्प्यात आला होता. विलिनीकरणाची तारीख देखील ठरली होती. येत्या १२ तारखेला विलिनीकरणाचा निर्णय होणार होता, असं मोठं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.
दोन राष्ट्रवादी एकत्र व्हाव्यात ही अजितदादांची इच्छा होती. त्यांची ही इच्छा पूर्ण व्हावी, अशी आमची इच्छा आहे, असं मोठं वक्तव्य देखील शरद पवारांनी केलं आहे. या वक्तव्यातून त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याला थेट ग्रीन सिग्नल दिला आहे. मात्र विलीनीकरणासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटातील मोठे नेते उत्सुक नाहीयेत. त्यामुळेच त्यांनी घाईघाईत सुनेत्रा पवारांच्या हाती उपमुख्यमंत्री पदाची सूत्रं दिल्याचा आता चर्चा सुरू झाली आहे.
इतकंच नव्हे तर अजित पवारांनी विलीनीकरणाबाबत 14 बैठका घेतल्या होत्या. विलीनीकरणाबाबत अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात बैठका झाल्या होत्या. बैठकीत सहभागी झालेले नेते विलीनीकरणावर सकारात्मक होते. त्या बैठकीत विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता.
