राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा गेली अनेक दिवस सुरू होती. काका-पुतण्याचा संघर्ष इतरांकडे सुरू असताना माझ्या काकांशी माझं बरं सुरू आहे, असे महापालिका प्रचारादरम्यान अजित पवार म्हणाले होते. याच काळात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चाही प्रमुख नेत्यांमध्ये सुरू होत्या. परंतु दोन्ही पक्ष एकत्र झाले तर आपल्या स्थानाला धक्का पोहोचेल आणि ठरवलेल्या गोष्टी होणार नाहीत, हे ध्यानात घेऊन अजित पवार यांना अग्निडाग देण्याआधीच प्रमुख नेत्यांनी एकत्रिकरण नकोच, ही भूमिका निश्चित केली.
advertisement
बारामतीच्या प्रसिद्ध हॉटेलवर बैठक
राष्ट्रवादीचे पुढचे भवितव्य काय? आणि नेतृत्व कुणाकडे द्यायचे? असा प्रश्न निर्माण झालेला असताना सुनेत्रा पवार याच पर्याय असतील, यावर बारामतीच्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची प्रथम चर्चा झाली. उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे साहजिक अजित पवार यांच्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडेच जातील, असे बैठकीत पुढे आले. दुसरीकडे राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पर्याय असल्याने त्यावर नंतर चर्चा करून मार्ग काढता येईल, असाही मतप्रवाह समोर आला.
जर सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करायला आणि शपथविधीला विलंब केला तर ज्येष्ठ नेते शरद पवार हे आपले राजकीय कौशल्य पणाला लावून एकत्रिकरणाची समीकरणे जुळवून आणू शकतात, अशी भीती राष्ट्रवादीतील महत्त्वकांक्षी नेत्यांना होती. तसेच पवार कुटुंबात दुखवटा असल्याने सगळे सदस्य बारामतीतच होते. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे मन वळवून, अजित पवार यांच्या माघारी अखंड राष्ट्रवादीची मोट बांधून दादांची इच्छा पूर्ण करण्याचे भावनिक कार्ड शरद पवार खेळू शकतात, असेही संबंधित नेत्यांना वाटत होते. त्याचमुळे घाईघाईने सुनेत्रा पवार यांच्यासमोर उपमुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव ठेवून त्याची अंमलबजावणी देखील काही तासांत करण्यात आली.
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची स्क्रिप्ट आधीच तयार होती?
सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रिपदासाठी निवड करणे हा राष्ट्रवादीचा म्हणजे आमच्या पक्षाला निर्णय आहे, असे थेटपणे सांगून एकत्रिकरणावर अद्याप आमची चर्चा नाही, असे घाईघाईत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले. सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरू असताना त्यांनी थेटपणे त्याच शपथ घेतील, असे सांगून मुहूर्तही सांगून टाकला. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या शपथेची स्क्रिप्ट अगोदरच तयार होती का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
