आज सुनेत्रा पवारांचा शपथविधी
दुसरीकडे सुनेत्रा पवार आज संध्याकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवली जाणार आहे.
शपथविधीला सुप्रिया सुळे गैरहजर राहणार
मात्र, या शपथविधीला सुप्रिया सुळे उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. शपथ विधीबाबतची कुठलीही माहिती नसल्याचे सुप्रिया सुळें यांचं म्हणणे आहे. तसेच उद्या संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अधिवेशनासाठी सुप्रिया सुळे दिल्लीला जाणार आहेत.
advertisement
कुटुंबात नाराजीचे वातावरण
विमान अपघातात निधन होण्यापूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे एकत्रीकरण व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी अनेक सार्वजनिक भाषणांतूनही त्याचे संकेत दिले होते. या विषयावर पवार कुटुंबीयांची एकत्रित चर्चा होणार होती, मात्र ती बैठक होऊ शकली नाही. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना शरद पवार किंवा कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांशी कोणतीही सल्लामसलत न केल्यामुळे काही सदस्य सुनेत्रा पवार यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जात आहे.
शपथविधीबाबत आम्हाला माहितीच नव्हती – शरद पवार
सुनेत्रा पवार यांनी केवळ प्रतिभा पवार यांना फोन करून शपथविधीसाठी मुंबईला जात असल्याची माहिती दिल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण खुलासा केला. शरद पवार म्हणाले, “सुनेत्रा पवार यांच्याशी या विषयावर आमची कोणतीही चर्चा झालेली नाही. शपथविधी होणार आहे, याचीही आम्हाला कल्पना नव्हती. एखादा पक्ष आणि त्याचे नेते काय निर्णय घेतात, हा त्यांचा अधिकार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात हीच दादांची इच्छा
यावेळी शरद पवार यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणावर थेट भाष्य केले. “दोन राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र याव्यात, ही दादांची इच्छा होती. त्यांची ही इच्छा पूर्ण व्हावी, अशी आमचीही मनापासून इच्छा आहे,” असे वक्तव्य करत त्यांनी या विषयावर आपली भूमिका मांडली.
