फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरला न्याय देण्यासाठी आणि पोलीस तपासाच्या अनुषंगाने काही हस्तक्षेप नोंदविण्यासाठी सुषमा अंधारे यांनी फलटण पोलीस स्टेशनला भेट दिली. त्यांच्याबरोबर शेकडो महिला आणि पीडित महिला डॉक्टरचे कुटुंबीय देखील होते. अंधारे यांचा रोख तपास अधिकारी तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर होता. आमची मुलगी गेली तरीही तिची बदनामी थांबत नाही, आमच्या मुलीच्या चारित्र्यहननाचा अधिकार चाकणकर यांना कुणी दिला? असा सवाल अंधारे यांनी केला.
advertisement
त्या सहा लोकांना तुम्ही आरोपी करणार का? सुषमा अंधारे यांच्याकडून प्रश्नांची सरबत्ती, DYSP खांबेंचे वारंवार एकच उत्तर
पोलीस उप अधीक्षक राहुल धस, आरोग्य अधिकारी अंशुमन धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक जायपात्रे, पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक आणि माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक शिंदे आणि नागटिळक यांना चौकशीच्या कक्षात घेणार का? असा प्रमुख सवाल अंधारे यांनी विचारला. त्यावर हा तपासाचा भाग आहे, मी तुम्हाला आत्ता काहीच सांगू शकत नाही, असे पोलीस उपअधीक्षक खांबे म्हणाले.
पीडित डॉक्टरचा मृत्यूपूर्वी जबाब आहे, अनेक नावे तिने जबाबात घेतली आहे. मग तरीही गुन्हा का दाखल करीत नाही? त्यांना लगोलग अटक करा असे माझे म्हणणे नाही परंतु त्यांना चौकशीच्या कक्षेत का घेत नाही? असे अंधारे यांनी विचारले. त्यावर तपासाचा भाग आहे, असे खांबे वारंवार उत्तर देत राहिले. माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार तपासाचा जो विहित कालावधी आहे, त्यानुसार तपास पूर्ण कारवाई करेन. तसेच तुम्ही सांगितलेल्या व्यक्तींना आरोपी करणे हे तपासाचा भाग असल्याने त्यांना आरोपी करणार की नाही, त्यांची चौकशी होणार की नाही, कशी होणार याची उत्तरे मी आत्ताच देऊ शकत नाही, असे खांबे म्हणाले.
रुपाली चाकणकर- जयकुमार गोरे यांच्या वक्तव्यांवर अंधारेंचा हल्लाबोल
मी विचारलेल्या प्रश्नांवर तपासाचा भाग आहे असे सांगून तुम्ही उत्तरे टाळण्याचा प्रयत्न करीत आहात. तर मग पोलीस अधीक्षकांच्या शेजारी बसून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन तपासातील महत्वाच्या तसेच गोपनीय बाबी सार्वजनिक का केल्या? असे करताना पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी चाकणकरांना का थांबवले नाही? जयकुमार गोरे कोण तीस मार खान आहे? पोलीस तपासाची गोपनीय माहिती ते सार्वजनिक का करतायेत? असे सवाल अंधारे यांनी उपस्थित केले.
फलटण पोलिसांच्या तपासावर विश्वासच नाही
फलटण पोलिसांच्या तपासावर विश्वासच नाही असे मृत डॉक्टरच्या कुटुंबियांनी मला सांगितल्याचे अंधारे म्हणाल्या. त्यावर तुम्हाला तपासावर विश्वास ठेवावा लागेल, असे खांबे म्हणाले. आवश्यक कारवाई करून प्रकरण जलदगती न्यायालयात चालवू, असेही खांबे यांनी सांगितले.
