मोमोजचा व्यवसाय उभारणाऱ्या साहिलचे स्वप्न अधुरं
मृतांमध्ये 24 वर्षांचा साहिल गोठे हा व्यवसायिक होता. अत्यंत मेहनती आणि त्याने जिद्दीनं मोमोचा व्यवसाय सुरू केला होता. त्याचे पुण्यात तीन स्टॉल होते. गरिबीशी झुंज देऊन स्वतःची थार कार घेणारा आणि पुण्यात तीन-चार ठिकाणी मोमोजचा व्यवसाय यशस्वीपणे उभा करणारा उद्योजक म्हणूनही परिसरात ओळखला जात होता. अवघ्या २० दिवसांपूर्वी त्याने ही नवीन थार कार घेतली होती. आपले जिवलग मित्र शिवा माने (२०), प्रथम चव्हाण (२३), श्री कोळी (१९), ओमकार कोळी (२०) आणि पुनीत शेट्टी (२१) यांना घेऊन तो पहिल्यांदाच कोकण दाखवण्यासाठी निघाला होता. पण, गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात त्यांच्या सगळ्यांच्याच स्वप्नांचा करुण अंत झाला.
advertisement
बचाव कार्य सुरू
अपघाताची माहिती मिळताच दरीत कोसळलेल्या तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संस्थेच्या रेस्क्यू टीमने हा अत्यंत अवघड बचाव कार्य हाती घेतलं. पोलीस प्रशासनही या बचाव कार्यात मदत करत आहेत. रेस्क्यू टीम दोरखंडाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढत आहेत. सध्या चार तरुणांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले आहेत, तर उर्वरित दोघांचा शोध अजूनही घेतला जात आहे.
एक ट्रिप ठरली शेवटची...
अवघ्या विशी-बाविशीतील सहा तरुणांनी एकत्र जमून केलेली ही कोकणची पहिली ट्रिप, त्यांच्या आयुष्याची शेवटची ट्रिप ठरली. व्यवसायात यश मिळवून नवी गाडी घेतलेला साहिल आपल्या मित्रांना पहिल्यांदाच कोकणचे सौंदर्य दाखवायला निघाला होता, पण नियतीने या तरुणांच्या नशिबी ताम्हिणी घाटाची खोल दरी लिहिली होती. कोंडवे धावडे गावातील या सहा तरुणांचा एका क्षणात झालेला अंत त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि संपूर्ण परिसरासाठी एक कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण करणारी घटना आहे.
