याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नागरिकांना घराजवळच दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एकूण 68 'नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर' उभारण्याचं नियोजन आखलं होतं. केंद्र सरकारच्या 15व्या वित्त आयोगातून या उपक्रमासाठी पालिकेला निधी उपलब्ध झाला आहे. मात्र, या आरोग्यमंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारच्या काही अटी होत्या. आरोग्य मंदिरासाठी 500 चौरस फूट जागा असली पाहिजे, अशी अट होती. या अटीनुसार ज्याठिकाणी अधिकृत इमारती उपलब्ध झाल्या, त्याठिकाणी पालिकेनं 16 आरोग्य मंदिरं उभारली.
advertisement
झोपडपट्टी भागात आरोग्य मंदिरासाठी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे काही आरोग्य मंदिरांची उभारणी रखडली होती. यावर पर्याय म्हणून ठाणे महापालिकेने आता विविध ठिकाणी पोर्टा कॅबिन दवाखान्यांची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार महापालिकेच्या मालकीच्या 51 जागांवर असे दवाखाने उभारले जाणार आहेत. शहरातील विविध प्रभाग समित्यांमधून 30 पेक्षा अधिक जागांची निवड करून तिथे टप्प्याटप्याने पोर्टा कॅबिन दवाखान्यांची उभारणी करण्यात येत आहे. या केंद्रांमध्ये प्राथमिक आरोग्य तपासणी, नियमित औषधोपचार, लसीकरण व मोफत औषधे इत्यादी सेवा देण्यात येतील. ही सेवा विनामूल्य असेल.
कुठे असतील आरोग्य मंदिरं?
ठाणे महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्तक नगर येथील समता नगर, धर्मवीर नगर, मानपाडा येथील कृष्णा नगर, कोकणीपाडा आणि टिकुजिनिवाडी परिसर, कोपरी, कळवा येथील घोलाईनगर आणि खारेगाव, वागळे इस्टेट, कौसा, उथळसर, शीळ, दिवा, माजिवडा येथे आरोग्य मंदिर असतील. हे दवाखाने सकाळी 9.30 ते 4.30 या वेळेत सुरू राहतील.