कुणाल विजय कुशाळकर असे जखमी झालेल्या १९ वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो आपल्या कुटुंबीयांसह शास्त्रीनगर रुग्णालयाच्या मागील शिवशक्ती चाळ भागात राहतो. रविवारी रात्री तो आपल्या काही मित्रांसह बेडेकर गल्ली परिसरात गरब्याच्या कार्यक्रमाला गेला होता. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कुशाळकरच्या मित्रांना दुसऱ्या गटातील काहीजण मारहाण करत असल्याची माहिती मिळाली. याचवेळी कुणाल कुशाळकर मित्रांना वाचवण्यासाठी आणि वाद मिटवण्यासाठी तातडीने त्या दिशेने पळत गेला.
advertisement
कुणाल मध्यस्थी करण्यासाठी येताच, चार आरोपींनी त्याला लक्ष्य केले. त्यांनी कुठलाही विचार न करता कुणालवर थेट चॉपर आणि लोखंडी सळईने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने गरबा कार्यक्रमात एकच घबराट पसरली आणि लोकांनी पळायला सुरुवात केली. हल्ल्यात कुणाल गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. परिसरातील नागरिकांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
कुणालच्या तक्रारीनुसार पोलिसांनी चार अज्ञात आरोपींविरुद्ध हत्येचा प्रयत्न आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. भर गर्दीत आणि धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी अशा प्रकारे हल्ला झाल्याने डोंबिवली शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
