सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने गुरुवारी सांगितले की, मुख्य आरोपी जितेंद्र पांडे याने सिंगापूर, हाँगकाँग आणि थायलंडमध्ये काळा पैसा पाठवण्यासाठी ९८ हून अधिक शेल कंपन्या आणि २६९ बँक खाती उघडली होती. या खात्यांचा तपास केला असता, आरटीजीएस एंट्रींच्या सोर्समधून ऑपरेटर्सचे एक नेटवर्क उघड झालं आहे. हे नेटवर्क पैशांचा मूळ स्त्रोत लपविण्यासाठी शेल कंपन्यांच्या विविध बँक खात्यांद्वारे व्यवहार करायचे, असं ईडीने म्हटलं आहे.
advertisement
अनेक बँक खात्यांमध्ये व्यवहार केल्यानंतर, शेवटी हा सगळा पैसा १२ खासगी कंपन्यांच्या बँक खात्यात यायचा, यानंतर इथून हा पैसा परदेशात पाठवला जायचा. चीनमधून आयात केलेल्या वस्तूंच्या पेमेंटच्या नावाखाली हा निधी देशाबाहेर पाठवण्यात येत होता. या बनावट कंपन्या मालवाहतूक आणि लॉजिस्टिक्स व्यवसायात काम करत असल्याचं आरोपींनी घोषित केलं होतं. आरोपींनी मालवाहतूक शुल्काच्या नावाखाली परदेशात प्रचंड निधी पाठवला, अशी माहिती ईडीने दिली.
या शेल कंपन्या स्थापन करण्यासाठी आणि आरओसी फाइलिंग करण्यासाठी आरोपींनी अनेक सीएची मदत घेतली होती, असंही ईडीने म्हटलं आहे. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी मुख्य आरोपी जितेंद्र पांडे याच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून ईडीकडून चौकशी सुरू आहे. संबंधित आरोपींवर बनावट कंपन्यांच्या नावाने उघडलेल्या बँक खात्यांच्या नेटवर्कमधून मालवाहतूक शुल्काच्या नावाखाली हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंडमधील संस्थांना १० हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम पाठवल्याचा आरोप आहे," असा दावा ईडीने केला आहे. पांडे आणि इतर आरोपींना गेल्या वर्षी ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती.
