आरोपी तरुणाने आपल्या सासू आणि मुलीवरही हल्ला केला. या हल्ल्यात त्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना मुंब्रा येथील आंबेडकर नगरमध्ये घडली. जरीन अन्सारी असे मृत महिलेचे नाव आहे. तर विजय उर्फ समीर कमलनाथ मिश्रा असे आरोपीचे नाव आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथील आंबेडकर नगरमध्ये जरीन अन्सारी (वय 30) ही महिला तिची मुलगी आणि एका मुलासह सासू आणि पती विजय उर्फ समीर कमलनाथ मिश्रा यांच्यासोबत राहत होती. तिच्या पतीने धर्मांतर करून त्याने मुस्लिम धर्म स्विकारला आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्यांच्यात वाद झाले. यानंतर तो भिवंडीत पत्नीपासून वेगळा राहत होता.
गुरुवारी अचानक तो आपल्या पत्नीला भेटायला आला आणि त्याने यावेळी रागाच्या भरात आपली पत्नी जरीनवर थेट हातोड्याने वार केला. यावेळी जरीनला वाचवण्यासाठी आलेल्या सासू आणि मोठ्या मुलीवरही विजयने हल्ला केला. या घटनेत जरीनचा मृत्यू झाला. तर त्याची सासू आणि मुलगी जखमी झाली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रत्यक्षदर्शी म्हणाले -
आरोपीच्या हातात हाथोडा आणि बॉम्बसदृश्य वस्तू होती. आरोपीने मी हा बॉम्ब फोडेन आणि तुलाही मारुन टाकेन, अशी धमकी दिली होती. त्यानंतर आरोपी पत्नीला आणि सासूला मारायला लागला. मला सगळ्यांना मारायचं आहे. मला हे जीवंत नकोत, असे तो ओरडत होता. त्यानंतर आरोपीने दरवाजा बंद केला आणि हातोड्याने पुन्हा त्यांना मारायला सुरुवात केली. जरीनला आणि तिच्या घरच्यांना वाचवण्यासाठी आलेल्यांनाही त्याने मारण्याची धमकी दिली होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. दरम्यान, आरोपीला अटक करण्यात आली असून आता मुंब्रा पोलीस पुढील तपास करत आहेत.
