गेल्या चार महिन्यांत (एप्रिल ते जुलै 2025) तब्बल 8 हजार 789 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही आकडेवारी परिस्थिती किती बिकट झाली आहे याची साक्ष देते. दरम्यान, शहरातील कचराकुंड्या, उकिरडे, रेल्वे स्थानके, मंदिर परिसर, शाळा परिसर, सोसायट्या आणि सार्वजनिक ठिकाणी भटक्या श्वानांचा वावर अधिक प्रमाणात असल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
advertisement
या समस्येवर उपाय म्हणून कल्याण-डोंबिवली महापालिकेने (केडीएमसी) खासगी एजन्सीची नियुक्ती केली आहे. या एजन्सीला भटकी कुत्री पकडणे, त्यांचे निर्बिजीकरण करणे आणि अँटी रेबीज लस देण्याची जबाबदारी दिली आहे. याबाबत महापालिकेचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी सांगितले की, एप्रिल 2025 ते जुलै 2025 या कालावधीत 4 हजार 552 कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले असून त्यांना अँटी रेबीज लसीकरणही देण्यात आले आहे. महापालिकेचा दावा आहे की दर महिन्याला साधारणपणे 1000 कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली जाते.
या कामासाठी महापालिकेला मोठा खर्च करावा लागतो. एका कुत्र्याच्या निर्बिजीकरण आणि लसीकरणासाठी जवळपास 989 रुपये खर्च येतो. एकूण वार्षिक खर्चाचा आकडा तब्बल एक कोटी 18 लाख रुपयांपर्यंत पोहोचतो. एवढा खर्च करूनही नागरिकांना आराम मिळत नाही, हीच खंत नागरिक व्यक्त करत आहेत. करदात्यांचे पैसे खर्च होऊनही समस्या सुटत नसल्याने नाराजी वाढत आहे.
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे लोकांमध्ये दहशत पसरली असून पालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. निर्बिजीकरण आणि लसीकरणाची प्रक्रिया सुरू असली तरी शहरातील रस्त्यांवर, गल्लीबोळांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचे थवे फिरताना दिसतात. हे थवे रात्रभर भांडणे, नागरिकांवर हल्ले करणे यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
सध्याच्या घडीला नागरिक प्रशासनाकडून ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत. फक्त निर्बिजीकरणाच्या आकड्यांवर समाधान मानून चालणार नाही, तर प्रत्यक्ष परिणाम दिसून यायला हवेत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. अन्यथा करदात्यांचा पैसा वाया जात राहील आणि भटक्या श्वानांचा प्रश्न आणखीनच गंभीर होईल.