कल्याण : कल्याण महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर आहे. याठिकाणचा ठक्कर समोसा हा खूप प्रसिद्ध आहे. तब्बल 48 वर्षांपासून चालू असलेलं ठक्कर फरसाण मार्ट हे कल्याणातले प्रसिद्ध समोसा विक्री केंद्र आहे. आज आपण याच समोसा विक्री केंद्राबाबत जाणून घेणार आहोत.
कल्याणातील टिळक चौकात ठक्कर फरसाण महाराष्ट्र हे दररोज सकाळी 7 वाजता सुरू होते. पूर्ण दिवसभर सुरू असते. पण तिथे समोसा हा फक्त सकाळी आणि संध्यकाळी मिळतो. ताजा आणि गरमागरम समोसा खायला इथे खवय्यांची मोठी गर्दी होते.
advertisement
सुरुवातीला ठक्कर यांनी मिठाई आणि फरसाण विकले. मग कालांतराने त्यांच्या मुलाने मिठाई बंद करून फक्त फरसाण आणि समोसा, वडा, ढोकळा या पदार्थांचा व्यवसाय सुरू केला. जेव्हा समोसा आणि इतर खाद्यपदार्थ विक्रीस सुरुवात झाली तेव्हा ते विशिष्ट वेळीच समोसे विकायचे. नंतर लोकांना त्यांचा समोसा आवडायला लागला आणि त्यांनी सकाळी सात वाजता समोसा विक्रीला सुरुवात केली.
सकाळी 7 ते 9 या 2 तासांतच त्यांचे समोसे संपायचे. 9 नंतर एकही समोसा दिसत नसे. मग यानंतर त्यांनी ग्राहकांसाठी आणखी एक निर्णय घेतला. समोसा खायला लोकांचा प्रतिसाद पाहता त्यांनी ग्राहकांच्या आग्रहाखातर सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळेला समोसा विक्री सुरू केली.
ठक्कर फरसाण मार्टचे मालक म्हणतात की, दररोज समोसा तितकाच विकला जातो. तसेच आमची चटणी लोकांना पसंत पडली आहे. तसेच फरसाण, ढोकळा हेही पदार्थ उत्तम मिळतात. 1976 साली माझ्या वडिलांनी हे दुकान सुरू केलं. त्यानंतर मी दुकानावर बसायला लागलो. तेव्हापासूनचा ग्राहकांचा जो प्रतिसाद आहे तो आजही तसाच टिकून आहे, असे मिथुन ठक्कर यांनी सांगितले. तुम्हालाही याठिकाणी हा प्रसिद्ध समोसा खायचा असेल तर तुम्ही याठिकाणी येऊ शकतात.