नेमके घडले तरी काय?
घडले असे की, भिवंडी शहरात राहत असलेल्या एका विद्यार्थ्याला इतर मित्रांबरोबर बसण्याची परवानगी न देता, त्याला जमिनीवर बसवून परीक्षा देण्यास भाग पाडले. ही घटना विद्यार्थ्यांने घरी सांगितली, तेव्हा पालकांनी लगेच शाळेत जाऊन प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, शाळेकडून केवळ फी शिल्लक आहे म्हणून शिक्षा देण्यात आली असे उत्तर मिळाले, जे कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थ्याच्या अधिकारांचे स्पष्ट उल्लंघन आहे.
advertisement
विद्यार्थ्यांच्या वडिलांनी शाळेतील अमानुष वागणुकीविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी मुख्याध्यापिका आणि संबंधित शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणात अल्पवयीन मुलांच्या संरक्षण कायद्याच्या कलम 75 आणि 87 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पालक, नागरिक आणि स्थानिक सामाजिक संघटनांनी शाळा प्रशासनाच्या या प्रकारच्या अमानुष आणि अपमानजनक वागणुकीवर तीव्र निषेध केला आहे. अनेकांनी या घटनेला शैक्षणिक संस्थांतील नैतिकतेवर आणि मुलांच्या हक्कांवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी मानले आहे.
विशेष म्हणजे ही घटना केवळ एका विद्यार्थ्याचा प्रश्न नाही, तर सर्व शाळा आणि विद्यार्थ्यांच्या अधिकारांसाठी धक्कादायक इशारा ठरली आहे. मुलांच्या सुरक्षिततेसाठी, आत्मसन्मान आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी शाळा प्रशासनाने तत्काळ जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि अशा प्रकारच्या अमानुष वागण्यावर कारवाई केली पाहिजे.