गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसामुळे गायमुख घाट रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यामुळे वाहतूक संथ गतीने चालत आहे. परिणामी,ठाणे-घोडबंदर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून वाहनचालकांना तासाभराहून अधिक वेळ कोंडीत अडकून पडावे लागत आहे. या परिस्थितीचा विचार करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत रस्ता खड्डेमुक्त करण्याचे निर्देश दिले. गणपतीसह आगामी सणासुदीच्या काळात वाहतुकीतील अडथळे टाळण्यासाठी मिरा-भाईंदर महापालिकेने संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
वाहतुकीतील बदल आणि असे असतील पर्यायी मार्ग
मुंबई आणि ठाण्याकडून घोडबंदरकडे जाणारी जड वाहने हे वाय जंक्शन आणि कापूरबावडी येथे प्रवेश बंद राहील. ही वाहने नाशिक रोडमार्गे खारेगाव टोलनाका, माणकोली आणि अंजूर फाट्यामार्गे वळवली जातील.तर कापूरबावडी जंक्शनहून वाहनांना उजवे वळण घेऊन कसेळी, अंजूर फाट्यामार्गे नेण्यात येईल.
मुंब्रा आणि फळव्याकडून येणारी वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद असेल तर ही वाहने खारगाव खाडी पुलाखालून, खारेगाव टोलनाका, माणकोलीमार्गे सोडली जातील. नाशिककडून येणारी जड वाहने माणकोली नाक्यावर प्रवेश बंद करून ती माणकोली पुलाखालून अंजूर फाट्यामार्गे वळवण्यात येतील. गुजरातकडून येणाऱ्या वाहनांना फाउंटन हॉटेल आणि चिंचोटी नाका येथे प्रवेश बंद असेल.ही वाहने चिंचोटी नाका येथून कामण, अंजूर फाटा, माणकोली, भिवंडीमार्गे नेण्यात येतील.
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आणि दुरुस्तीच्या काळात अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच, लहान वाहनांसाठी मार्ग खुले राहतील, मात्र काम सुरू असताना वेग नियंत्रित ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.
