गेल्या काही महिन्यांपासून गायमुख ते खारेगाव कोस्टल रोडला मूर्त स्वरूप प्राप्त झालेय. या कामाचा प्रकल्प अहवाल ठाणे महापालिकेने तयार केला असून त्यासाठी 1200 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च एमएमआरडीएकडून केला जाणार आहे. 13.45 किलोमीटर लांबीच्या या कोस्टल रोडची रुंदी 40 ते 45 मीटर असेल.
advertisement
दरम्यान, प्रस्तावित कोस्टल रोडच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली होती. या कामासाठी एमएमआरडीएकडे 1316.98 कोटींचा सुधारित प्रकल्प अहवालही सादर केला होता. याबाबत प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराने आराखडा सादर केल्यानंतर खर्चामध्ये दुपटीने वाढ झाली. आता किनारा रस्ता प्रकल्पासाठी 2727 कोटींचा निधी लागणार असून त्याला एमएमआरडीएच्या बैठकीत मंजुरीही देण्यात आली आहे.
जनहित याचिकेवर सुनावणी कधी?
कोस्टल रोड प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी हरकती नोंदविल्या होत्या. त्याबाबत काही जनहित याचिका दाखल होत होत्या. यामुळे प्रकल्प रखडण्याबरोबरच त्याच्या खर्चात वाढ होत होती. या पार्श्वभूमीवर प्रकल्पाला सर्व परवानग्या मिळाल्यानंतर उच्च न्यायालयाची मान्यता घेण्याचा निर्णय देण्यात आला होता. त्यानुसार, सर्व परवानग्या मिळताच पालिकेने 13 ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयापुढे माहिती सादर केली. आता याबाबत 4 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असल्याचे महापालिका सूत्रांनी सांगितले.