घोडबंदरवरील काजूपाड्यापासून चढण रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे मीरा-भाईंदर महापालिकेने त्याच्या मजबुतीकरणाचे काम सुरू केले होते. रस्ता खोदून त्याचे मजबुतीकरण केले. मात्र, पावसाने उघडीप न दिल्याने पुढील काम राहिले होते. आता पुन्हा रस्त्याची दुरवस्था होऊन चढणीवर वाहतूक मंदगतीने होऊन मोठी कोंडी होत होती. शिवाय या ठिकाणी अपघात होत होते.
advertisement
पावसाने उघडीप दिल्याने आता मीरा – भाईंदर महापालिकेने या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम पुन्हा हाती घेतले आहे. त्यासाठी ठाण्याकडे जाणारी मार्गिका बंद केली जाणार आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयाचे उपायुक्त (मुख्यालय) अशोक वीरकर यांनी जड वाहनांना वाहतूक बंदीची अधिसूचना जारी केली आहे.
हे मार्ग राहणार बंद
गुजरात, पालघर, वसई-विरारकडून येणाऱ्या अवजड वाहनांना बंदी असेल. तसेच मुंबई, मीरा-भाईंदरकडून वरसावे नाका येथून घोडबंदरमार्गे जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांना देखील प्रवेश बंद केला आहे. तर ठाण्याकडून येणाऱ्या अवजड वाहनांनादेखील कापूरबावडी येथेच बंदी आहे.
पर्यायी मार्ग कोणते?
गुजरात, पालघर, विरारकडून राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वरून येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना शिरसाट फाटा येथून पारोळ-अंबाडी मार्गाने वळवण्यात आले आहे. यात वसईकडून महामार्गावर येणाऱ्या अवजड वाहनांना चिंचोटी, कामण, भिवंडीमार्गे वळवले आहे. मुंबई, मीरा-भाईंदरकडून वरसावे नाका येथून घोडबंदरमार्गे जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांना प्रवेश बंद केला आहे. ही वाहने चिंचोटी - कामणमार्गे, शिरसाट फाटामार्गे घेऊन जावी लागतील.