मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश हिंदोला असं या 50 वर्षीय प्रवाशाचं नाव. ते नवी मुंबई महानगरपालिकेत काम करतात. त्यांचं घर आहे टिटवाळ्यात. संध्याकाळच्या वेळी मध्य रेल्वे मार्गावरील लोकल गाड्यांमध्ये प्रवाशांची तुफान गर्दी असते. या गर्दीतून प्रवास नको म्हणून त्यांनी विदर्भ एक्स्प्रेसमधून प्रवास केला. शिवाय त्यांना घरी लवकर पोहोचायचं होतं. एक्स्प्रेसचा प्रवास सुस्साट असतो, त्यामुळे कल्याण स्थानकात उतरून दुसरी लोकल पकडेन आणि लवकर टिटवाळ्याला घरी पोहोचेन असा विचार त्यांनी केला. मात्र त्यांचं हे गणित पार चुकलं.
advertisement
अंकुश यांना एवढी घाई होती की, जवळ लोकलचा पास असताना ते अवैधरित्या एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. त्यात कल्याण स्थानकात चालत्या एक्स्प्रेसमधून उतरण्याची घाई त्यांनी केली. त्यानंतर जे घडलं ते बघून इतर प्रवाशांनी किंकाळ्या फोडल्या. अंकुश उतरताना एक्स्प्रेस आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडले, त्यातच त्यांचे दोन्ही पाय गेले. सोमवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
अंकुश यांना एक्स्प्रेसमधून पडताना पाहून इतर प्रवाशांनी आरडाओरडा केला. त्यानंतर एक्स्प्रेस थांबली आणि अंकुश यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. पुढच्या उपचारांसाठी त्यांना सायन रुग्णालयात हलविलं. तिथं त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडल्याचं कळतं आहे.