गायमुख चौपाटीचं खास वैशिष्ट्य म्हणजे येथे उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा. हा पुतळा चौपाटीच्या प्रवेशद्वाराजवळ आहे आणि वेळोवेळी स्थानिक लोक त्यावर फुले अर्पण करतात, त्यामुळे या ठिकाणी एक आदरभाव आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण होतं. पर्यटक आणि स्थानिक दोघेही इथे दर्शनासाठी थांबतात.
advertisement
गायमुख चौपाटीचं वातावरण पावसात अगदी सुंदर दिसतं. आकाशात काळे ढग, समुद्राच्या लाटा, आणि सभोवताली पसरलेली हिरवाई हे सगळं एकदम मनाला शांत करणारा अनुभव देतं. इथे मोकळ्या जागा आहेत जिथे लहान मुलांना खेळायला जागा मिळते, झाडाखाली बसून गप्पा मारता येतात आणि फोटोसुद्धा छान येतात.
या ठिकाणी बोटिंगचीही सुविधा आहे. कुटुंबासोबत तुम्ही छोट्या बोटीत बसून पाण्यावर फिरू शकता. हे बोटिंग मुलांसाठी वेगळाच अनुभव असतो. पावसात थोडं थांबून बोटीतून निसर्ग पाहणं ही एक छोटी सहलच वाटते. चौपाटीवर खाण्यापिण्याचे थोडेफार स्टॉल्स असतात, पण मोठ्या प्रमाणात काही सुविधा नाहीत. त्यामुळे जेवणाचे सामान किंवा पाण्याच्या बाटल्या स्वतःसोबत न्यायल्या हरकत नाही. तसंच, कचरा न करता परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाने घ्यावी.
कशी पोहोचाल?
गायमुख चौपाटी ठाण्याच्या घोडबंदर रोडजवळ आहे. खासगी वाहनाने किंवा कॅबने सहज जाता येतं. काही लोक बस किंवा रिक्षानेही जातात. रस्त्याच्या शेवटी थोडंसं चालावं लागतं.
जर तुम्ही ठाण्यात राहत असाल आणि पावसात कुठेतरी निवांत फिरायला जायचा विचार करत असाल, तर गायमुख चौपाटी एक छान पर्याय आहे. निसर्ग, शांतता आणि मुलांसाठी थोडी मजा हे सगळं एकाच ठिकाणी अनुभवायला मिळतं.