भाजपची सत्ता येणार
दीर्घ काळ प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या नाशिक महापालिकेत पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रचारादरम्यान विकास, पायाभूत सुविधा, आगामी कुंभमेळ्याची तयारी, स्मार्ट सिटी प्रकल्प आणि नागरी सुविधांचा मुद्दा भाजपने आक्रमकपणे मांडला होता. त्याला मतदारांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याचे या निकालातून दिसून येत आहे. अनेक प्रभागांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला असून, काही ठिकाणी अटीतटीच्या लढतीतही भाजपने बाजी मारली आहे.
advertisement
शिंदे २ नंबरचा पक्ष ठरला
या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. शिंदे गटाने आतापर्यंत २१ जागांवर विजय मिळवला असून, भाजपच्या तुलनेत त्यांना समाधानकारक यश मिळाले असले तरी सत्ता स्थापनेपासून ते दूर राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), रिपब्लिकन सेना युती तसेच महाविकास आघाडीने काही प्रभागांमध्ये चांगली लढत दिली, मात्र बहुसंख्य जागांवर भाजपचा वरचष्मा कायम राहिला.
१२२ जागांसाठी निवडणूक
नाशिक महापालिकेच्या ३१ प्रभागांतील एकूण १२२ जागांसाठी ही निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत तब्बल ७३५ उमेदवार रिंगणात उतरले होते. यामध्ये ५२७ उमेदवार विविध राजकीय पक्षांचे तर २०८ उमेदवार अपक्ष होते. भाजपकडून सर्वाधिक ३८ माजी नगरसेवक निवडणूक लढवत होते, तर शिवसेना शिंदे गटाकडून ३० माजी नगरसेवक मैदानात होते. एकूण ८७ माजी नगरसेवक पुन्हा एकदा मतदारांच्या कसोटीवर उतरले होते, त्यापैकी सहा माजी नगरसेवकांनी अपक्ष म्हणून उमेदवारी केली होती.
या निवडणुकीत १२२ पैकी तब्बल ९६ जागांवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये थेट सामना पाहायला मिळाला. भाजपने ही निवडणूक पूर्णपणे स्वबळावर लढवली होती, तर शिवसेना शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि रिपब्लिकन सेना यांच्यासोबत युती केली होती. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि मनसे यांनीही आपापली ताकद पणाला लावली होती.
अखेरच्या निकालांनुसार भाजपने नाशिकमध्ये निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असून, महापालिकेवर एकहाती सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता महापौरपदासह स्थायी समिती आणि विविध सभापती पदांवर भाजपची पकड मजबूत राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
