दिव्यांग, विशेष मुले, कष्टकरी कामगार, कातकरी समाज तसेच दूरवर शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनींपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचविण्याचे काम हे मंडळ प्रेमाने आणि जबाबदारीने करत आहे. या उपक्रमांतर्गत साईनाथ मंडळ ट्रस्ट, जय गणेश व्यासपीठ, एकता मित्रमंडळ, श्री शनि मारुती बाल गणेश मंडळ, वीर शिवराज मित्रमंडळ आणि त्रिसुंड मयुरेश्वर विजय मंडळ यांच्या सहकार्याने विविध सामाजिक कार्ये पार पाडली जातात.
advertisement
"मदत नको, संधी द्या" या घोषवाक्याखाली ट्रस्ट दिव्यांग आणि विशेष मुलांनी बनविलेल्या वस्तूंची खरेदी करून त्यांना प्रोत्साहन देते. त्यांच्या कलाकृतींना बाजारपेठ मिळावी, आत्मसन्मानाने जगण्याची प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू असल्याचे ट्रस्टचे प्रमुख पीयूष शहा यांनी सांगितले. भोर, वेल्हा आणि मुळशी परिसरातील कातकरी आणि कोळी कुटुंबांना दरवर्षी फराळाचे वाटप केले जाते. यासोबतच शाळांमधील शिपाई, मावशी, गार्ड यांसारख्या दुर्लक्षित कर्मचाऱ्यांना मिठाई बॉक्स आणि दिवाळी भेटकार्ड देऊन त्यांचा सन्मान केला जातो.
समाजाच्या प्रत्येक थरातील मेहनती हातांपर्यंत सणाचा आनंद पोहोचवण्याचा प्रयत्न ट्रस्टकडून केला जातो. याशिवाय, मजूर अड्ड्यांवरील कष्टकरी बांधवांसोबत स्नेहाची दिवाळी साजरी करण्याची परंपरा मंडळाने जोपासली आहे. येथे दिवाळी फराळाचे वाटप, ज्येष्ठ मजुरांचे औक्षण आणि दिवंगत मजुरांच्या कुटुंबियांना स्मृतिदीप देऊन सांत्वन करण्याचे भावनिक उपक्रम राबविले जातात. विशेष म्हणजे, साईनाथ मंडळ ट्रस्ट आणि संयुक्त मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी उत्तर-पूर्व भारतातून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थिनींबरोबर भाऊबीज साजरी केली जाते.
स्वच्छता लक्ष्मीचा सन्मान, डेड हाऊसमधील कर्मचाऱ्यांचा गौरव, आणि गाईच्या पूजनाद्वारे संस्कृतीची जपणूक अशा अनेक उपक्रमांतून या मंडळाने समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या 15 वर्षांत एक दिवा वंचितांकरिता हा उपक्रम साईनाथ मंडळ ट्रस्टचे हे कार्य समाजातील प्रत्येक व्यक्तीला दिवाळीच्या खऱ्या अर्थाचा प्रकाश वाटण्यातच खरा आनंद आहे. हा संदेश देत, पुण्याच्या सामाजिक संवेदनशीलतेचा उज्ज्वल दीप ठरत आहे.