याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे (पश्चिम) येथील अधिकारी क्वार्टर्सची जागा रेल्वे भूमी विकास प्राधिकरणामार्फत (आरएलडीए) दीर्घकालीन भाडेतत्त्वावर दिली जाणर आहे. यासाठी लवकरच पश्चिम रेल्वे आणि आरएलडीए यांच्यात सामंजस्य करार होणार आहे. वांद्रे पश्चिममध्ये रेल्वेच्या सध्या 35 ते 40 इमारती आहेत. या जमिनीच्या विकासासाठी महसूल शेअरिंग मॉडेल, भाड्याचा कालावधी, एफएसआयचा निर्देशांक आणि जमिनीची आधारभूत किंमत यांसारख्या बाबी पुढील टप्प्यात निश्चित केल्या जातील.
advertisement
एका रेल्वे अधिकाऱ्याने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. सध्या 5 हजार कर्मचारी क्वार्टर्स मिळण्यासाठी वेटिंग लिस्टमध्ये आहेत. वांद्रे पश्चिम येथील जमिनीवर 20 ते 25 मजली इमारत आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी क्वार्टर्स बांधल्या जातील. त्यानंतर शिल्लर राहिलेली जमीन व्यावसायिक वापरासाठी भाडेतत्त्वावर दिली जाईल.
हजारो कोटींच्या उत्पन्नाची अपेक्षा
रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाने सोमवारी (8 सप्टेंबर) परळ, महालक्ष्मी आणि वांद्रे येथील एकूण 19.57 एकर जमिनीच्या विकासासाठी निविदा मागवल्या आहेत. या प्रकल्पांतून आठ हजार कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. या जमिनीला प्रति चौरस फूट सुमारे 95 हजार रुपयांपर्यंत दर मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.