बुलढाणा शहरातील पोलिस लाईन परिसरात ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास हे धाडस दाखवले. ज्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या घरी चोरी झाली, त्यात एएसआय गजानन वारे, पोलिस हेड कॉन्स्टेबल रिंढे, पोलिस कॉन्स्टेबल रुबीना शेख, आणि पोलिस कॉन्स्टेबल ठाकूर यांचा समावेश आहे. यापैकी काही कर्मचाऱ्यांच्या घरी कोणीही नसल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला.
चोरी करताना चोरट्यांनी अत्यंत हुशारी दाखवली. त्यांनी ज्यांच्या घरी चोरी करायची होती, त्या घरांच्या दरवाजाचे कडीकोंडे तोडून आत प्रवेश केला. विशेष म्हणजे, त्यांनी शेजारील घरांना बाहेरून कडीकोंडा लावला, जेणेकरून चोरी होत असताना कोणीही बाहेर येऊ नये आणि मदतीसाठी आरडाओरडा करू नये. हा प्रकार पाहून चोरट्यांनी किती तयारी केली असावी, याचा अंदाज येतो.
advertisement
या चोरीच्या घटनेत चोरट्यांनी सोने, चांदी, रोख रक्कम आणि अन्य लाखो रुपयांचा मुद्देमाल घेऊन पळ काढला. या घटनेमुळे पोलिस दलातच मोठी खळबळ उडाली आहे. रक्षकच सुरक्षित नसतील, तर सामान्य नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पोलिस लाईनसारख्या सुरक्षित ठिकाणी जर असे प्रकार घडत असतील, तर शहरात गुन्हेगारीने किती मोठे आव्हान उभे केले आहे, हे दिसून येते.
एकाच रात्रीत पाच पोलिसांच्या घरी चोरी होणे, हे बुलढाण्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे गंभीर चित्र दर्शवते. या घटनेने सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच वाढले आहे. या घटनेनंतर पोलीस आता चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत, पण या चोरीमुळे बुलढाणा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
