गिरीष प्रभुणे यांच्या पुढाकाराने 2006 पासून सुरू असलेली ही संस्था महाराष्ट्रभरातील वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांसाठी शिक्षण आणि व्यवसायिक कौशल्य दोन्ही गोष्टींची जुळवाजुळव करते. या शाळेत 5 वी ते 9 वी पर्यंतचे सुमारे 300 विद्यार्थी आहेत. त्यामधील बरीच मुलं अशी आहेत ज्यांना आई-वडील नाहीत. काहींचे पालक शिकार करून उपजीविका करतात तर काहींचे पालक मजुरी करून संसार चालवतात.
advertisement
Plastic: प्लास्टिकपासून उपयुक्त वस्तूंची निर्मिती, पुण्यातील संस्था करतेय काम, काय आहे उपक्रम?
शिक्षणाबरोबरच या मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून त्यांना इको-फ्रेंडली शाडू मातीचे गणपती बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. दरवर्षी ही मूलं साधारणपणे 50 हून अधिक गणपती स्वतःच्या हाताने घडवतात. या मूर्ती पर्यावरणपूरक असून मूर्तींना आकार देणे, रंगकाम, तपशील सजावट ही सर्व कामं मुलंच करतात. विक्रीतून मिळणारे पैसे थेट विद्यार्थ्यांना दिले जातात आणि त्यांचा उपयोग शिक्षणासाठी होतो.
"गणपती तयार करण्याची ही प्रक्रिया केवळ एक कला नसून मुलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवणारी क्रिया आहे. सणासुदीच्या काळात मिळणारं हे प्रशिक्षण आणि अनुभव भविष्यात त्यांच्या उपजीविकेचा पर्याय ठरू शकतो," असं संस्थेतील शिक्षिका ममता सोनवणे म्हणाल्या.
गणपतींच्या हंगामातच नव्हे, तर दिवाळीच्या वेळीही या शाळेतील मुलांना पणती तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. यामुळे वर्षभर त्यांच्यात कौशल्यविकासाची सातत्यपूर्ण प्रक्रिया सुरू राहते. अशा प्रकारे सणासुदीच्या काळात मिळालेल्या अनुभवातून या मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि जीवनातील आव्हानांना सामोरं जाण्याची ताकद मिळते.
या मुलांनी तयार केलेल्या गणेशमूर्ती पूर्णतः नैसर्गिक व पर्यावरणपूरक असतात. शाडू मातीच्या मूर्ती पाण्यात विरघळतात आणि पर्यावरणावर कोणताही नकारात्मक परिणाम करत नाहीत. ग्राहकांनाही या हाताने बनवलेल्या कलात्मक मूर्ती आवडतात. त्यामुळे दरवर्षी या शाळेतील गणपतींची मागणी वाढतच आहे.
या उपक्रमामुळे, गणपती बाप्पाची मूर्ती घडवताना या मुलांच्या आयुष्याचीही जडणघडण होत आहे. एकेकाळी समाजाच्या मुख्य प्रवाहाबाहेर असणाऱ्या या मुलांच्या आयुष्यात आता संस्कृती, कला आणि पर्यावरण यांचा सुंदर संगम घडतो आहे. आगामी गणेशोत्सवात चिंचवडमधील हे 'गुरुकुल गणपती' अनेकांच्या घरात विराजमान होणार असून, त्याबरोबरच आशेचा आणि प्रगतीचा संदेशही घेऊन जाणार आहेत.