याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रो 4 ही 32.32 किलोमीटरची लेन आहे तर मेट्रो 4 अ लेनची लांबी 2.7 किलोमीटर आहे. या दोन्ही लेनवर मिळून 32 स्टेशन्स असतील. पहिल्या टप्प्यात, या दोन्ही मेट्रो लेन मिळून गायमुख ते कॅडबरी जंक्शन या 10.5 किलोमीटर मार्गावर मेट्रो सुरू केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुरू होणाऱ्या मेट्रो मार्गावर कॅडबरी जंक्शन, माजिवाडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकुजीनीवाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कासारवडवली, गोवनीवाडा आणि गायमुख ही 10 स्टेशन्स असतील.
advertisement
पहिल्या टप्प्यातील मेट्रोचं 88 टक्के कामं पूर्ण झालं असून येत्या 15 दिवसांत चाचणी होण्याची शक्यता आहे. एमएमआरडीएकडून, पहिल्या टप्प्यातील मार्गावर असलेल्या स्टेशन्सची कामं युद्धपातळीवर पूर्ण केली जात आहेत. एमएमआरडीएने डोंगरीपाडा स्टेशन ते गायमुखपर्यंत या मार्गावरील विद्युत वाहिन्या 30 ऑगस्टपासून कार्यान्वित केल्या आहेत. तसेच सोमवारी या मार्गिकेवर पहिल्यांदा गाडी धावली.
ठाणे शहरातील मेट्रोच्या कामाकडे नागरिकांचं खूप दिवसांपासून लक्ष लागून आहे. अनेक वर्षांपासून मेट्रोचं काम रखडलं होतं. विविध अडचणींमुळे नागरिकांना वाहतुकीच्या समस्यांना सामोरं जावं लागत होतं. आता मेट्रोचं काम अंतिम टप्प्यात आलं असून लवकरच ठाणेकरांच्या सेवेत मेट्रो दाखल होईल.