मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्कवर परंपरेनुसार शिवसेनेचा दसरा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला उद्धव ठाकरे, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, दिवाकर रावते, अनंत गीते, भास्कर जाधव, सुषमा अंधारे आदी नेते उपस्थित होते. भर पावसात झालेल्या मेळाव्याला शिवसैनिकांनी देखील प्रचंड उपस्थिती लावली.
गाढवाने वाघाची चादर ओढलेलं मी पहिल्यांदा पाहिले, शिंदेंवर निशाणा
उद्धव ठाकरे म्हणाले, "दसऱ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा. किती वेळा मी बोलायचे आपल्यासारखी अशी जीवाला जीव देणारी माणसं हेच माझ्या आयुष्यातील खरे सोने आयुष्य आहे. अनेक जणांना आपली शिवसेना फोडण्याचे लक्ष आहे. त्यांनी काही जणांना पळवलं ते पितळ होते, पण सोने माझ्याकडे आहे. वाघाचे कातडे पांघरलेले कोल्ह्याची गोष्ट आपण ऐकली असेल. पण गाढवाने वाघाची चादर ओढलेले मी पहिल्यांदा पाहिले. ते अमित शाह यांचे जोडे उचालणारे आहे, त्यांच्यावर किती आणि काय बोलायचे..."
advertisement
ठाकरेंचा फडणवीस यांच्यावर प्रहार
शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली, घरं दारं वाहून गेली. शेतकरी आज विचारतोय काय खायचं, अशी परिस्थिती आज आली नाही. मराठवाड्यात आपत्ती आहे. संकट खूप मोठं आहे. लातूरला भूकंप झाला होता, तेव्हा आपण गावं दत्तक घेतली होती. आता आपल्याकडे सरकार नाही. पण मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आपल्याला फुल नाही फुलाची पाकळी तरी द्यावी लागणार आहे. आपले सरकार होते तेव्हा हे बोंबलत फिरत होते, ओला दुष्काळ जाहीर करा, पण आता तेच ओला दुष्काळ नाही म्हणत आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत करा. कोणतेही निकष ठेवू नका. आमचे सरकार होते तेव्हा आम्ही काहीही न पाहता कर्जमाफी केली होती. आताही तशाच कर्जमाफीची गरज आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.