उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मराठी जल्लोष मेळाव्याला माध्यमांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी आभार मानले. तसेच मराठीविरोधात अकलेचे तारे तोडणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावर नाही तर पक्षाच्या भूमिकेवर शंका व्यक्त करीत भाजप हा मराठीचा मारेकरी असलेला पक्ष आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजप खासदार दुबेला उद्धव ठाकरेंनी ठाकरी भाषेत ठणकावले
advertisement
मुंबई आणि महाराष्ट्रात जे अमराठी गुण्या गोविंदाने नांदतायेत. परंतु निवडणुकीच्या तोंडावर यांच्यात काड्या लावण्याचे उद्योग भारतीय जनता पक्षाचे लोक करीत आहेत. भाजपचे राजकारण हे तोडा फोडा आणि राज्य करा, असे इंग्रजांच्या नीतीचे राहिले आहे. दुसऱ्याच्या घराची होळी झाली तरी चालेल पण आपल्या राजकारणाच्या पोळ्या शेकल्या पाहिजेत, हेच भाजपचे धोरण आहे. निशिकांत दुबे कोण आहे, त्याला कोण ओळखतंय? पण भाजप हाच मराठीचा खरा मारेकरी आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी हल्ला चढवला.
भारतीय जनता पक्षाचा उद्योग जरी काड्या लावण्याचा असेल तरी शिवसेना आणि शिवसैनिक हे कधीही मराठी-अमराठी असा भेद करीत नाही. आमचे रक्तदान शिबीर असो वा कुठलाही सामाजिक कार्यक्रम असो त्यात आम्ही कधीही जातपात पाळत नाही. दुबेसारख्या काड्या लावणाऱ्या लोकांनी आधी हे समजून घ्यायला हवे की आमचा विरोध हिंदी भाषेला नसून हिंदीच्या सक्तीला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी फडणवीस-शेलारांनाही सुनावले
आशिष शेलार यांनी मराठी आंदोलनाची तुलना पहलगाममधील अतिरेक्यांशी केली तसेच ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर बोलताना ती रुदाली (रडगाणे) होते, अशी संभावना फडणवीस यांनी केली. दोघांच्याही वक्तव्याला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले.
मराठी माणूस आपल्याच मराठी भाषेसाठी महाराष्ट्रात आंदोलन करतोय आणि सत्ताधारी पक्ष त्याच मराठी माणसाला दहशतवादी म्हणतायेत. मला त्यांना विचारायचेय पहलगाममधले अतिरेकी कुठे आहेत? ते सापडत का नाहीत? त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला का? आशिष शेलार यांच्यासारखे कर्मदरिद्री लोक महाराष्ट्रात आहे, हे आपले दुर्दैव आहे, असे ठाकरे म्हणाले.
ज्या मूळ भाजपसोबत शिवसेना पक्षाची युती होती तो भाजप आता मेलाय. ऊर बडवायला त्यांनी आमच्यातले लोक घेतले, काँग्रेस राष्ट्रवादीतले लोक घेतले. दु:ख व्यक्त करण्यासाठीही त्यांच्याकडे ओरिजनल माणसे नाहीत. फडणवीसांची प्रतिक्रिया समजू शकतो. दोन भावांचे एकत्र येणे आणि मराठी भाषेचे आंदोलन हे जर रुदाली वाटत असेल तर हे हिणकस आणि विकृत आहे. आम्ही एकत्र आलो आहेत. म्हणून यांच्या बुडाला आग लागली आहे. पण त्यांना ती दाखवता पण येत नाही आणि शमवता पण येत नाही.