TRENDING:

'बॉस'कडून दानवेंच्या पाठीवर कौतुकाची थाप, समोरासमोर बसलेल्या एकनाथ शिंदेंना तोंडावर सुनावलं!

Last Updated:

Ambadas Danve: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज विधान परिषदेतून निवृत्त होत आहे. विधान परिषदेचा कार्यकाळ संपत असल्याने साहजिक दानवे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचाही कार्यकाळ संपुष्टात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या कारकीर्दीचे तोंडभरून कौतुक केले. पण त्याचवेळी समोर बसलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांना तोंडावर सुनावले. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची सभागृहात एकत्र येण्याची आणि समोरासमोर बसण्याची ही गेल्या तीन वर्षातील पहिलीच वेळ होती. त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दानवे यांचे कौतुक करताना अपेक्षेनुसार उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर बोचरी टीका केली.
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे
advertisement

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज विधान परिषदेतून निवृत्त होत आहे. विधान परिषदेचा कार्यकाळ संपत असल्याने साहजिक दानवे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचाही कार्यकाळ संपुष्टात आला आहे. आज दानवे यांच्या निरोपाच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषणे केली. अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे एकत्रित शिवसेनेतून निवडून आलेल्या अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाला उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेही हजर असल्याने त्यांच्या दोघांच्या भाषणांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते.

advertisement

'सोन्याच्या चमच्या'वरून शिंदेंनी डिवचलं

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकारणावर फारसे भाष्य न करता अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेतेपदाची कारकीर्द, त्याआधी त्यांनी केलेली अभिनव आंदोलने, सरकार आणि विरोधी पक्षात दानवे यांनी ठेवलेला समन्वय, सरकारच्या चांगल्या कामांना विरोधी पक्षनेते म्हणून दानवे यांनी दिलेली सहमती किंवा कौतुक अशा अनेक गोष्टी शिंदे यांनी अधोरेखित केल्या. पण भाषणांदरम्यान जुन्या आठवणी सांगताना त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार टोले लगावले. अंबादास दानवे हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले नेते नाहीत किंवा राजकारणी नाही. पण तरीही आपल्या कर्तृत्वाने ते विरोधी पक्षनेते पदापर्यंत पोहोचले, असे शिंदे म्हणाले. सामान्यत: सोन्याचा चमचा असा उल्लेख ते दरवेळा ठाकरे यांच्यासंदर्भात करतात. आताही त्यांनी ठाकरेंचे नाव न घेता सणसणीत टोला लगावला.

advertisement

एकनाथ शिंदे यांचे भाषण आटोपताच सभापती प्रा. राम शिंदे यांनी भाषणासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव पुकारले. उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या पहिल्याच वाक्याला जोरदार षटकार ठोकला. अंबादासजी तुम्ही आज जरी सभागृहातून जात असला तरी मी पुन्हा येईन बोला आणि त्याच पक्षातून येईल असे बोला, असे म्हणत त्यांनी फडणवीस यांना टोला हाणला. त्यांच्या पहिल्याच टोल्यावर विधान परिषदेत हास्यकल्लोळ झाला.

advertisement

उद्धव ठाकरेंनी उट्टं काढलं

उद्धव ठाकरे म्हणाले, काही जण आज अंबादास दानवे यांचे कौतुक करीत असले तरी मी ज्यावेळी अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली होती त्यावेळी काहींचे चेहरे वेगळे होते. आज आत्ता मुख्यमंत्री नाहीयेत, त्यांना धन्यवाद देतो, प्रांजळपणे कबूल करतो, भाजप संघाच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता त्यांनी आम्हाला दिला. त्यांना मी जसे धन्यवाद देतोय, तसे धन्यवाद ते मला देतायेत की नाही... कारण त्यांनी माझ्याकडून बरेच सहकारी घेतलेत... असे फटकारे ठाकरे यांनी लगावले.

advertisement

दानवेजी तुमचा अभिमान आहे, शिवसेनाप्रमुखांनाही अभिमान वाटत असेल. परंतु हळहळ वाटत असेल की पहिली टर्म बघता बघता पूर्ण झाली. पदे येतात, जातात पण त्या पदाचा उपयोग जनमाणसांसाठी करायचा असतो. जनमाणसांत आपली प्रतिमा काय आहे, हे माणसांच्या आयुष्याचे फलित असते. मला पद मिळाले पाहिजे, माझे पद टिकले पाहिजे, यासाठी अनेक जण धडपडत असतात. आत्ता उल्लेख झाला (एकनाथ शिंदे यांनी उल्लेख केला) की अंबादास दानवे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाहीत. अगदी खरे आहे की ते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाहीत. रण त्यांनी भरलेल्या ताटाशी कधी प्रतारणा केली नाही. ज्यांनी ताट दिले त्या पक्षाशी प्रतारणा केली नाही. ताटातले माझेच आहे, असेही ते म्हणाले नाहीत. किंवा अजून काही मिळावे म्हणून दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचे, असा अपराधही त्यांनी केला नाही, यासाठी जनता दानवे यांना धन्यवाद देत असेल, असे ठाकरे म्हणाले. ठाकरे यांच्या बोलण्यात पक्षफुटीविषयीची खंत होती. त्यावरूनच त्यांनी शिंदे यांचे नाव न घेता विधान परिषदेच्या सभागृहात त्यांनी अगदी समोरासमोर सुनावले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'बॉस'कडून दानवेंच्या पाठीवर कौतुकाची थाप, समोरासमोर बसलेल्या एकनाथ शिंदेंना तोंडावर सुनावलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल