मुंबईमधील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर काही समाजकंटकांनी रंग फेकल्याचा प्रकार बुधवारी सकाळी समोर आला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांनीही पुतळ्याची पाहणी करून घटनेची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर देखील उपस्थित होते.
ज्याला स्वत:च्या आई वडिलांचे नाव घ्यायला लाज शरम वाटते त्यानेच हे कृत्य केले असेल
advertisement
पुतळ्याच्या पाहणीनंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "आज जो अत्यंत निंदनीय प्रकार घडला, हे करणाऱ्या दोन प्रवृत्ती असू शकतात. एक तर ज्याला स्वत:च्या आई वडिलांचे नाव घ्यायला लाज शरम वाटते अशाच बेवारस लाव्हारीस माणसाने केले असेल आणि दुसरे बिहारमध्ये ज्याप्रमाणे पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींचा अवमान झाला म्हणत काही जणांनी बिहारमध्ये बंद करण्याचा असफल प्रयत्न केला. असाच कुणाचा तरी महाराष्ट्र पेटविण्याचा प्रयत्न असेल".
समाज कंटकांना अशी कृती करून महाराष्ट्र पेटवायचा असेल
पोलिसांशी आम्ही चर्चा केली, सीसीटीव्ही शोधून आम्ही आरोपीला तत्काळ पकडू, असे त्यांनी आम्हाला सांगितले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. समाज कंटकांना अशी कृती करून महाराष्ट्र पेटवायचा असेल, अशी भीतीही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. शिवसैनिकांच्या भावना तीव्र आहेत. आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितले आहे. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे ते लवकरात लवकर आरोपीला शोधतील, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.