उद्धव ठाकरे यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्हाप्रमुखांची मातोश्रीवर बैठक घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना तीव्र आंदोलन करण्या संदर्भात आदेश दिले आहे.
रक्त वाहिल्यानंतर क्रिकेट खेळता? उद्धव ठाकरेंचा सवाल
पंतप्रधानांनी आपल्या भावनांशी खेळ केला आहे. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही म्हणाले आता रक्त वाहिल्यानंतर क्रिकेट खेळता? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. 14 तारखेला आक्रमकपणे आंदोलन करा, महिला आघाडीने सिंदूर पंतप्रधानांना पाठवा असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.
advertisement
ठाकरे पक्षाकडून राज्यव्यापी आंदोलनाची हाक
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. पाकिस्तान विरोधात क्रिकेट खेळण्यास परवानगी दिल्यामुळे केंद्र सरकार विरोधात आंदोलन करणार आहे. 'माझं कुंकू माझं देश' म्हणत राज्यभरात आंदोलन करणार आहे. पहलगाम भ्याड आतंकवादी हल्ल्यात हात असलेल्या पाकिस्तान विरूद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी दिल्याचा निषेध ठाकरे गटाकडून करण्यात येणार आहे.
गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नेत्यांचे भ्रष्टाचाराचे मुद्दे समोर आणा: उद्धव ठाकरे
जिल्हा परिषद, नगरपंचायत नगरपालिकांच्या निवडणुकीच्या तयारीला आतापासून लागा, निवडणुका कधीही लागू शकतात. स्थानिक पातळीवर आपण किती जागांवर लढू शकतो किंवा आपली किती ताकद आहे हे आधीच ठरवा, आघाडी की युती? संदर्भात स्थानिक पातळीवरील आपलं मत मांडा... स्थानिक पातळीवर जागा वाटपाचा उशीर न करता लवकर निर्णय घ्या तसेच मतदार याद्या आतापासून तपासा आणि त्यावर त्याचवेळी तक्रारी करा, मतदार यादीतील घोळांकडे विशेष लक्ष द्या . गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नेत्यांचे भ्रष्टाचाराचे मुद्दे समोर आणा, असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.