मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी अचानक शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांची भेट गुप्त होती, कारण या भेटीची माहिती कोणालाच देण्यात आली नव्हती . उद्धव ठाकरे अचानक आले आणि तेही शिवतीर्थच्या मागच्या प्रवेशद्वारातून आत गेले . सकाळी 11.50 वाजता ते आत गेले आणि दुपारी 1.45 वाजता बाहेर निघाले. तब्बल पावणे दोन तासाहून अधिक काळ उद्धव ठाकरे शिवतीर्थावर होते. या भेटीत नेमकी काय काय चर्चा झाली? कोण कोण उपस्थित होते? यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जातायत.
advertisement
उद्धव आणि राज ठाकरेंच्या भेटीचे अनेक अंग आहेत. ते पाहुयात
- सेनापती मैदानाबाहेर असल्याने उद्धव स्वतः मैदानात उतरले का?
उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वी संजय राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. संजय राऊत सध्या आजारी आहेत आणि ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, ठाकरेंची बाजू बेदरकारपणे मांडणारे राऊत हे राज आणि उद्धव ठाकरेंचे दूत होते. दोन भावांमध्ये समेट घडवणं, एकमेकांचे मेसेज एकमेकांना पोहचवणं. युतीसाठी पहिल्या फळीत काम करणारे राऊत सध्या उपस्थित नसल्याने उद्धव ठाकरे यांना स्वतःला मैदानात उतरून लढावं लागतंय का?
- केवळ राऊत नाहीत म्हणून उद्धव ठाकरे मैदान उरले नाहीत.. मग गुप्तता पाळायची आहे का ?
संजय राऊत सध्या नसले तरी उद्धव ठाकरेंचे इतर अनेक विश्वासू नेते आहेत. काही नेते मुंबईतल्या जागावाटपासंद्भात भेटीगाठी घेतायत, पण तरीही आजच्या भेटीची माहिती अनेक वा कोणत्याच नेत्याला नव्हती अशी माहिती आहे. मग आजची भेट ही जशी अचानक वा गुप्तपणे ठरली तशीच ती नेत्यांसाठीही गुप्त का होती? आणि इतर नेत्यांवर अविश्वास नाही, पण अशी कोणती चर्चा करायची असेल ज्याची माहिती अगदी जवळच्या शिलेदारांनाही देण्यात आली नाही. वा कोणत्याच नेत्याला कळवण्यात आली नाही. किंवा सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे दोन्ही बंधू एकत्र येऊन काही अनपेक्षित बदल घडवणारा निर्णय घेणार आहेत का ? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय.
ठाण्यातले शिलेदारच का ?
राज आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली तेव्हा ठाकरे यांच्या व्यतिरिक्त शिवतीर्थावर केवळ वरुण सरदेसाई, राजू पाटील आणि अविनाश जाधव उपस्थित होते. राजू पाटील मनसेचे कल्याण डोंबिवलीतले माजी आमदार आहेत. अविनाश जाधव मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष आहेत, तर वरुण सरदेसाई ठाकरेंचे आमदार, नातेवाईक आणि दीपेश म्हात्रे पक्ष सोडून गेल्यामुळे कल्याण डोंबिवलीची सध्यपूर्ती जबाबदारी दिलेले नेते आहेत. त्यामुळे ठाण्यात वा संपूर्ण जिल्ह्यात ठाकरेंची सत्ता पुनर्स्थापित करणे आणि महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांना ठाकरे ब्रँडची झलक दाखवण्यासाठी काही वेगळी व्यूहरचना ठाण्यात आखायची असेल तर त्यासंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता आहे . आणि या सगळ्यात अविनाश जाधव यांना ताकद पुरवून महापालिका निवडणुकीत आपलं वर्चस्व सिद्ध करायचं आहे का ? ही देखील चर्चा आहे.
युती की पक्ष एक व्हायचं ?
राज आणि उद्धव ठाकरे आज एकत्र येतायत. भेटीगाठी होतायत, पण यासाठी एकसूत्रता ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ही भेट केवळ जागा वाटप करण्यासाठी किंवा युतीच्या वरचेवर होणाऱ्या चर्चेसाठी असण्याची शक्यता फार थोडी आहे. कारण त्यासाठी अनेक महत्वाचे नेते दोन्ही बंधूंकडे आहेत आणि त्यांच्याकडून तश्या चर्चेच्या फेऱ्याही झडतायत, पण दोन्ही बंधूंची आज झालेली बैठक बंद दाराआड केवळ दोन बंधू आणि चार भिंतींच्या आत उपस्थितीत झाली. गुप्तता इतकी की कोणतेही नेते उपस्थित नाहीत. ही भेट केवळ दोन पक्ष एकत्र आणण्याच्या सूत्रावर चर्चा करण्यासाठी नव्हे तर दोन्ही पक्ष एकत्र आणण्यावर असावी, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे .
