काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'शरद पवारांच्या जर जास्त जागा आल्या तर त्यांच्या मनात जर जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड किंवा आणखी कुणाचं नाव असेल तर त्यांनी जाहीर करावं. काँग्रेसने जाहीर करावं, मी जाहीर करेन. मला हे महाराष्ट्राचे लुटारू नको आहेत. त्यांनी माझ्या पाठीत वार केला, याचा मला राग आहे. याचा अर्थ मला मुख्यमंत्री व्हायचंच आहे असा नाही', असं उद्धव ठाकरे मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले आहेत.
advertisement
शरद पवारांनी सांगितला मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला
काहीच दिवसांपूर्वी शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला सांगितला होता. निवडणुका झाल्यानंतर ज्यांच्या जास्त जागा निवडून येतील, त्यांना आम्ही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवायला सांगू आणि त्याला पाठिंबा देऊ, हे आमच्या पक्षाचं धोरण आहे, असं शरद पवार म्हणाले होते.
उद्धव ठाकरे चेहऱ्यासाठी आग्रही
विधानसभा निवडणुकीच्या सुरूवातीपासूनच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, यासाठी आग्रही होते. ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री या फॉर्म्युलामध्ये मित्रपक्षच एकमेकांचे उमेदवार पाडतात आणि पाडापाडी होते, त्यामुळे आधीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी शरद पवार आणि काँग्रेससमोरच जाहीर सभेतून केली होती, पण उद्धव ठाकरेंची ही मागणी शरद पवार आणि काँग्रेसकडून मान्य झाली नाही.
मुख्यमंत्रिपदावर ठाकरेंचं भाष्य
यानंतर मंगळवारी झालेल्या जाहीर सभेतून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर भाष्य केलं. 'तुम्हाला वाटत असेल उद्धव ठाकरेंना पुन्हा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण माझ्या मनात तसं अजिबात नाही. तसं वेड माझ्या डोक्यात असतं तर मी वर्षा निवासस्थान सोडून गेलोच नसतो. मला फक्त महाराष्ट्र वाचवायचा आहे. मला मुख्यमंत्रिपदापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं तुमचं प्रेम आहे. मी वर्षा बंगला एका मिनिटात आहे त्या कपड्यानिशी सोडला होता', असं उद्धव ठाकरे म्हणाले.
