विजयमाला केदार आणि नितीन केदार असं मारहाण झालेल्या मायलेकाचं नाव आहे. गावगुंडानी भर रस्त्यात गाठून त्यांना मारहाण केली आहे. यावेळी नितीन या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये शूट करत होता. यावेळी अन्य एका आरोपीनं मोबाईल हिसकावून घेत त्याला मारहाण केली. हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे केदार कुटुंबीय दहशतीखाली असून, मारहाण करणाऱ्या आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
advertisement
मारहाणीचा अमानुष व्हिडिओ व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित यांच्यात मागील काही काळापासून जमीनीचा वाद सुरू आहे. याच वादातून ५ डिसेंबर रोजी दोघांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी पीडित केदार कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. ही तक्रार का दाखल केली? याच रागातून गावगुंडांनी आई आणि मुलाला रस्त्यात अडवून पुन्हा अमानुष मारहाण केली. मारहाणीचा हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून, तो व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
गंभीर जखमी झालेल्या विजयमाला केदार यांनी आपली आपबीती सांगितली. त्या आणि त्यांचा मुलगा नितीन केदार यांच्यावर गावगुंडांनी अतिशय क्रूरपणे हल्ला केला. मारहाणीदरम्यान आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली असल्याचं केदार कुटुंबाने सांगितलं आहे. सध्या जखमी विजयमाला केदार आणि मुलगा नितीन यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विशेष म्हणजे पीडित कुटुंबाने यापूर्वीच पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, केज पोलिसांनी फक्त तक्रार नोंदवून घेतली आणि आरोपींवर कोणतीही ठोस कारवाई केली नाही. जर पोलिसांनी वेळीच आरोपींना समज दिली असती किंवा कारवाई केली असती, तर आज ही दुसरी गंभीर घटना घडली नसती, अशी तीव्र नाराजी केदार कुटुंबाने व्यक्त केली आहे. केज पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे पुन्हा एक गंभीर घटना उघडकीस आली आहे. आता या प्रकरणावर पोलीस काय कारवाई करणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
