या उपक्रमातून दहीहंडीची पारंपरिक संकल्पना शिक्षणाशी जोडली गेली आहे. शैक्षणिक साहित्याने भरलेली हंडी सुमारे 20 फूट उंचीवर बांधली जाते आणि नेत्रहीन विद्यार्थ्यांना ती फोडण्याची संधी दिली जाते. विद्यार्थ्यांमध्ये साहसाची भावना आणि आत्मविश्वास वाढावा, हा यामागचा हेतू आहे. यंदा या उपक्रमाचं विसावं वर्ष आहे. या दहीहंडी उत्सवात शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दहीहंडी फोडण्याचा मान यंदा पूर्णतः नेत्रहीन असलेल्या रेश्मा कोळेकर हिने पटकावला. तिच्या धाडसी प्रयत्नांनी संपूर्ण वातावरणात उत्साह संचारला होता. या निमित्ताने विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलं.
advertisement
Dahihandi 2025: गोकुळाष्टमीला आपल्या घरीच बनवा गोपाळकाला, अवघ्या 5 मिनिटांत रेसिपी तयार
रेश्मा कोळेकर हिने अलीकडेच एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. याशिवाय चेतन शिरसाट या विद्यार्थ्याने न्यू इंडिया इन्शुरन्समध्ये क्लर्क म्हणून रुजू होऊन संस्थेचं नाव उज्ज्वल केलं आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेतील विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रदान करून त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक हातभार लावण्यात आला.
राहुल देशमुख यांनी सांगितलं की, नेत्रहीन मुलांमध्ये साहसी वृत्ती व आत्मविश्वास निर्माण करणे, हे या उपक्रमामागचं मूळ उद्दिष्ट आहे. दहीहंडी हा खेळ नेत्रहीन विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक असतो. पण, ते धाडसाने सहभागी होतात. प्रत्येक वर्षी नवा उत्साह अनुभवायला मिळतो. या कार्यक्रमामुळे कला, कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते.
कार्यक्रमात मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या. संस्थेच्या या प्रयत्नामुळे आज अनेक नेत्रहीन आणि दिव्यांग विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वी होत आहेत. संगणक शिक्षण, कौशल्यविकास, शैक्षणिक मार्गदर्शन आणि सामाजिक सहभाग या सर्व बाबींमध्ये संस्था सातत्याने कार्यरत आहे.