समोर आलेल्या माहितीनुसार, धर्माबाद येथील एका मतदान केंद्रावर काही संशयित मतदार मतदानासाठी आल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. हे मतदार तेलंगणातील असल्याचा आरोप करत काही नागरिकांनी आक्षेप घेतला. याचवेळी बोगस मतदान केल्याच्या आरोपातून एका महिलेला आणि एका पुरुषाला संतप्त जमावाने मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेमुळे मतदान केंद्राबाहेर मोठा जमाव जमा झाला आणि परिस्थिती अधिकच चिघळली.
advertisement
पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. मात्र, तरीही काही काळ तणाव कायम राहिला. जमाव पांगवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, मतदान केंद्र परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
आरोपांची पोलिसांकडून चौकशी
दरम्यान, बोगस मतदानाच्या आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. संबंधित मतदारांची ओळख, मतदान यादीतील नावे आणि ओळखपत्रांची तपासणी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासन दक्ष
या घटनेमुळे काही काळ मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर मतदान पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व प्रक्रिया पार पडत असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासन दक्ष असल्याचे सांगण्यात आले.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
धर्माबादमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे राजकीय वातावरण तापले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असून, पुढील परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे.
पैशाचे आमिष दाखवून मतदारांना डांबले
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे पैशाचे आमिष दाखवून मतदारांना डांबून ठेवल्याचा प्रकार उघड झाला , नंतर धर्माबाद मधील शास्त्री नगर महिलांना देखील मतदानासाठी पैसे देण्याचे आमिष दाखवत मंदिरात नजर कैदेत ठेवण्यात आले होते . दरम्यान या दोन्हीं घटना उघड झाल्यानंतर निवडणूक विभागाने या घटनांचे दाखल घेतली . धर्माबादच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी दोन्हीं ठिकाणीं भेट देउन पाहणी केली . या दोन्ही घटना मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक आयोगाला कळवण्यात आल्या आहेत या दोन्हीं घटनांची पोलीस आणि आचार संहिता पथका कडून चौकशी सुरु आहे . चौकशीचा अहवाल आल्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल अस निवडणूक निर्णय अधिकारी सुरेखा स्वामी यांनी सांगितले
