गेवराईच्या मोंढा भागातील मतदान केंद्रावर मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने मतदान प्रक्रिया गालबोट लागली. सकाळपासूनच दोन गटांमध्ये शाब्दिक चकमक सुरू होते. मात्र दुपारपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जात जमावाने हिंसक वळण घेतले. पोलिसांना घटनास्थळी कडेकोट बंदोबस्त तैनात करावा लागला.
वाहनांची तोडफोड
शहरातील मोंढा भागातील मतदान केंद्राबाहेर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्का-बुक्की आणि शिवीगाळ झाली. याच दरम्यान काही अज्ञात तरुणांनी रस्त्यावर उभी असलेल्या वाहनांची तोडफोड केली. दोन-तीन वाहनांच्या काचा फोडण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी तात्काळ गेवराई पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
advertisement
माजी आमदाराच्या घरासमोर दगडफेक
माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोरच काही व्यक्तींनी दगडफेक केली. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला. पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार पंडित गटातील कार्यकर्त्यांनी घडवून आणल्याचा आरोप केला असून पोलिसांनी दोन्ही बाजूंकडील काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी अतिरिक्त फोर्स मागवून संपूर्ण शहरात गस्त वाढवली आहे. मतदान केंद्रांच्या परिसरात पोलीस आणि राज्य राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. कोणताही अनुचित प्रकार पुन्हा घडू नये यासाठी सर्वत्र बंदोबस्त वाढवण्यात आली आहे.
मतदारांना भयभीत करण्यासाठी वाद
बीडच्या गेवराईमध्ये सामान्य मतदारांना भयभीत करण्यासाठी पंडित आणि पवार यांचा वाद सुरू आहे.. लोकशाही प्रक्रियेत असा धुडगूस घालणार यावर योग्य कारवाई करून भयमुक्त मतदान करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते शिवराज बांगर यांनी केली
सामान्य मतदारांमध्ये दहशतीचे वातावरण
घटनेनंतर जिल्हा प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून, हिंसक प्रकारात सहभागी असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, गेवराईतील या घटनांमुळे निवडणूक प्रक्रिया ढवळून निघाली असून सामान्य मतदारांमध्ये दहशतीचे वातावरण कायम आहे.
हे ही वाचा :
