मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनपेक्षित आणि वेगवान घडामोडी घडत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटले यांचा फोन झाल्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची एक अत्यंत 'हाय-व्होल्टेज' बैठक पार पडणार असून या बैठकीत पक्षाच्या भवितव्याबाबत मोठे निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्याचे मोठे आव्हान सध्या पक्षासमोर आहे. पक्षात नेतृत्वावरून कोणतीही फूट पडू नये आणि सर्व आमदार एकसंध राहावेत, यासाठी दिलीप वळसे पाटील यांची भूमिका निर्णायक मानली जात आहे. वळसे पाटील हे शरद पवार आणि अजित पवार अशा दोन्ही गटांसाठी विश्वासार्ह नाव असल्याने, त्यांच्या मुंबई दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
खलबते होण्याची दाट शक्यता
राजकीय वर्तुळात सध्या शरद पवार गट आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यातच काही आमदारांनी 'साहेबांच्या' नेतृत्वाखाली परतण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व टिकवायचे की विलीनीकरणाचा मार्ग स्वीकारायचा, यावर खलबते होण्याची दाट शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या आगामी सत्तेच्या समीकरणांसाठी टर्निंग पॉईंट
दुसरीकडे, महायुती सरकारमध्ये रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदावर कोणाची वर्णी लागणार? आणि आगामी निवडणुकांसाठी जागावाटपाचे नवे सूत्र काय असेल? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीही ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. मुंबईत पोहोचल्यानंतर वळसे पाटील इतर ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून पुढील दिशा स्पष्ट करतील. एकूणच, आजची ही बैठक केवळ राष्ट्रवादी काँग्रेससाठीच नव्हे, तर महाराष्ट्राच्या आगामी सत्तेच्या समीकरणांसाठी टर्निंग पॉईंट ठरू शकते.
